मुंबईच्या विकासात बेस्टचे महत्त्वपूर्ण याेगदान आहे. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी बेस्ट सक्षम करणे आवश्यक असून, यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट प्रशासनाला केली. यासाठी शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना उपदान (ग्रॅच्युइटी), काेविड भत्ता, कायमस्वरूपी तसेच हंगामी स्वरूपातील कामगारांना नेमणूकपत्र आदींच्या माध्यमातून न्याय दिल्याबद्दल श्रमिक उत्कर्ष सभेच्या वतीने धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमाचे आयाेजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये करण्यात आले हाेते. या प्रसंगी फडणवीस यांच्यासह आमदार सर्वश्री आशिष शेलार, प्रवीण दरेकर, श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष प्रसाद लाड, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आदी उपस्थित हाेते.
फडणवीस यांच्या हस्ते यावेळी बेस्ट कामगारांच्या उपदानासाठीचा (ग्रॅच्युइटी) 332 काेटींचा; तसेच काेविड भत्त्यापाेटीचा 78 काेटींचा धनादेश प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी कामगार आणि हंगामी कामगारांना नेमणूकपत्र, धाडसी कार्य करणाऱ्या कामगारांचा सत्कार, पदाेन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पत्र देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
बेस्ट कामगारांच्या जुन्या झालेल्या निवासी संकुलांच्या पुनर्विकासाबाबत तसेच बेस्टच्या सक्षमीकरणाला मदत हाेईल, अशा पद्धतीने बस डेपाेच्या पुनर्विकासाबाबतही आराखडा तयार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या. बेस्ट कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्याबद्दल लाड यांनी राज्य शासनाचे आभार मानले.शेलार, दरेकर यांनीही बेस्ट कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.