समान विचार असतील, तर व्यवहार समाधानकारक हाेतात

    28-Jul-2024
Total Views |
 
 

thoughts 
 
मानवी जीवनात संवादाला महत्त्व असते.संवाद म्हणजे वैचारिक आदानप्रदान; मात्र मनात कटुता ठेवून, दांभिकता आणि ‘मी’पणा ठेवून व्यवहार केल्यास संवाद कमी व वाद अधिक हाेताे. मुळात, मीच श्रेष्ठ आहे, हे गृहीत धरून सुरू केलेला संवाद वादविवाद घडवताे. जाे अनेकदा प्रगतीला अडथळा ठरताे. संवादावर भर दिल्यास प्रश्न सहज सुटतात; शिवाय आपली मानसिकताही चांगली राहते. माेठेपणा मिरविण्याची हाैस असणारे अनेक जण दिसत असतात. ते त्यासाठी सतत व्यासपीठ शाेधतात. अशा व्यक्ती अनेकदा नसलेल्या क्षमता दाखवतात. अशा व्यक्तींशी संवाद साधून; अथवा व्यवहार करून वेळ वाया जाताे. म्हणूनच, काेणताही व्यवहार करताना याेग्य व्यक्ती, याेग्य वेळ, याेग्य परिसराची निवड करावी.
 
समान विचार असतील, तर व्यवहार समाधानकारक हाेतात. संवाद साधताना समाेरच्या व्यक्तीची आवड, क्षमता पाहणे आवश्यक आहे. संगणकतज्ज्ञ एखाद्या बांधकाम कर्मचाऱ्याशी संगणकाविषयी बाेलला, तर त्याला त्याच्या विषयातले अधिकचे ज्ञान कसे मिळेल? त्यामुळे, संवाद साधताना दुसऱ्या व्यक्तीची क्षमता, आसक्ती, पात्रता पाहावी लागते. विवाहाचेही संवादाप्रमाणेच आहे. जाेडीदार निवडताना बुद्धिमत्ता, आराेग्य, आचरण, संस्कार, वय यांचा विचार न पाहता अनेकदा पदवी, संपत्ती, नाेकरी, व्यवसाय पाहिला जाताे.डाॅक्टरला डाॅक्टर, इंजिनीअरला इंजिनीअर शाेधण्याची प्रथा आहे; पण असे करून संसार सुखाचा हाेताे का? आयुष्यभर यातील किती जण साैख्याने नांदतात? जाेडीदार याेग्य हवा. समजूतदारपणा, नातेसंबंधांचे महत्त्व ओळखणारे, परस्परांना समजून घेणारे आणि विचारांचे आदर करणारे सहचर असतील, तर वैवाहिक जीवन सुखाचे ठरते. यांपैकी काही बिघाड असल्यास विसंवाद ठरलेला.