पुणे, 16 जुलै (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनचे नाव आता ‘डिस्ट्रीक्ट कोर्ट, पुणे' असे झाले आहे. याबाबत केंद्र सरकारने नुकतीच अधिसूचना जारी केली. लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे. जिल्ह्यातील वकिलांची शिखरसंघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनने नावबदलासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. शहरात मेट्रो सुरू झाली तेव्हापासून शिवाजीनगर न्यायालय येथील स्टेशनला ‘सिव्हिल कोर्ट' नाव देण्यात आल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात सिव्हिल म्हणजे दिवाणी दावे चालतातच. मात्र फौजदारी, मोटार अपघात न्यायप्राधिकरणसह विविध प्रकारचे दावे चालतात. जवळच कौटुंबिक न्यायालयसुद्धा आहे. त्यामुळे सिव्हिल एवढे मर्यादितच का नाव दिले, असा प्रश्न निर्माण झाला होता. वकिलांमध्ये याबाबत नाराजी होती.
येथील न्यायालयाला शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय संबोधले जाते. मात्र, स्टेशनचे नाव सिव्हिल कोर्ट होते. त्यामुळे शिवाजीनगर की सिव्हिल कोर्ट असे वेगळे हा प्रश्न सर्वसमान्य नागरिकांना पडत होता. सिव्हिल नावावरून वकील वर्गामध्येही नाराजी होती. त्यामुळे नाव बदलण्यासाठी मेट्रोकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.
-ॲड. संतोष खामकर (अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन)