वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर

    16-Jul-2024
Total Views |
 
va
 
पुणे, 15 जुलै (आ.प्र.) :
 
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद, रेज अल्युमिनी असोसिएशन व सद्गुरू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, जांभूळवाडी रोड व सोलापूर ग्रामीण पोलीस दल यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर व औषध वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. माळशिरस पोलीस स्टेशनच्या आवारात आयोजित केलेल्या शिबिरात 600 हून अधिक वारकरी व पोलीस बांधवांनी शिबिराचा लाभ घेतला.
 
याप्रसंगी बोलताना आयोजक डॉ. वीरेंद्र पवार यांनी सांगितले की, वारकरी व पोलीस बांधवांना वारीच्या अंतिम टप्प्यात आरोग्य सेवा कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे वारकऱ्यांचा पुढील प्रवास वेदनारहित व सुखकर व्हावा, आजारामुळे त्यात खंड पडू नये, या उद्देशाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या आयोजनाला पोलीस उपायुक्त नारायण शिरगावकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात डॉ. वीरेंद्र पवार व भारती विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. रोहित चव्हाण, डॉ. मनोज सुरवसे व इतर 40 डॉक्टरांनी रुग्णसेवा केली.