बांधवगडमधील कर्मचाऱ्यांना विमाकवच

पुनीत बालन ग्रुपकडून 1,100 कर्मचाऱ्यांना 15 वर्षांसाठी मिळणार विमासुरक्षा

    10-Jul-2024
Total Views |
 
 
ban
पुणे, 9 जुलै (आ.प्र.) :
 
पुण्यातील प्रसिद्ध पुनीत बालन ग्रुपने आपल्या सामाजिक कार्यात आणखी एक नवे पाऊल टाकले आहे. ग्रुपतर्फे आता वन्यजीव पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बांधवगड राष्ट्रीय उद्यानात काम करणाऱ्या तब्बल अकराशे कर्मचाऱ्यांना 8.5 कोटी रुपयांपर्यंतचे सुरक्षाकवच बहाल केले आहे. या कर्मचाऱ्यांची 15 वर्षांसाठी ‌‌‘जीवन विमा पॉलिसी' काढून देण्यात आली आहे. वन्यजीव आणि पर्यावरणाबाबत विशेष प्रेम असलेल्या पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याकडून या राष्ट्रीय उद्यानाला यापूर्वी 20 लीफ ब्लोअर मशीन भेट देण्यात आल्या होत्या.
 
जंगलात आग लागल्यास या लीफ ब्लोअर मशीनचा मोठा उपयोग होतो. येथील वन विभागाचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून वेगवेगळ्या विभागांत काम करतात. त्यामुळे येथील अकराशे कर्मचाऱ्यांना पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याकडून 15 वर्षांसाठी विमाकवच बहाल करण्यात आले. या मदतीबाबत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बालन यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या एका समारंभात युवा उद्योजक पुनीत बालन यांनी या विमासुरक्षेबाबतची घोषणा केली.
 
यावेळी उद्यानाचे अपर मुख्य वनरक्षक डॉ. बी. एस. अन्नीगेरी, मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक एल. एल. उईके, प्रधान मुख्य वनरक्षक अतुल श्रीवास्तव, एसडीओ सुधी मिश्रा, नरसी ग्रुपचे नरसी डी. कुलरिया, वास्तुविशारद अनुज वकील, डीडी बीटीआर प्रकाश वर्मा, एसडीओ बीटीआर सुधीर मिश्रा, आरओ बीटीआर पुष्पा सिंग आणि डॉ. रमाकांत पांडा यावेळी उपस्थित होते.
 
वन्यजीव ही आपली खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यानात अनेक दुर्मीळ पशुपक्षी आहेत. महत्त्वाचे म्हणजे आपला राष्ट्रीय प्राणी वाघांची संख्या सर्वांत जास्त याच उद्यानात आहे. या सर्वांची चांगल्या पद्धतीने काळजी घेता यावी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही संरक्षण मिळावे, या भावनेतून ही छोटी मदत करण्याचा मी प्रयत्न केला.
                                                                                                                              -पुनीत बालन, (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)
 
बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात आहे. 716 चौ. किलोमीटर क्षेत्रफळ असलेले बांधवगड हे 1968 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर 1993 मध्ये हे उद्यान व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले.