आर्थिक गुंतवणुकीचे चक्र

    09-Jun-2024
Total Views |
 
 

money 
 
गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी या आर्थिक बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी काही प्रमुख पर्याय म्हणजे बँका, पाेस्ट ऑफिसच्या याेजना, भांडवली बाजारातील गुंतवणूक, खासगी कंपन्यांमधील ठेवी, सरकारी कंपन्यांमधील ठेवी, सरकारी कर्जराेखे, पब्लिक प्राॅव्हिडंट फंड, म्युच्युअल फंड, व्हेंचर कॅपिटल, स्थानिक पातळीवरील सहकारी पतसंस्था. गुंतवणूकदारांची गुंतवणूक अडचणीत येण्याचे सर्वांत प्रमुख कारण सर्वसामान्य ठेवीदारांस जास्त व्याजदराचे आकर्षण व कमी व्याजदराचे न पटलेले महत्त्व.
जास्त व्याजदर-जास्त धाेका हे घाेषवाक्य सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. लाभ आणि लाेभ यामध्ये एका मात्रेचा फरक असला तरी यामुळे कित्येकदा सर्वसामान्य गुंतवणूकदार धाेक्यात आल्याचे आपण पाहताे.वास्तविक दहा हजार रुपये कमावण्यास आपणास एखादे वेळेस पाच महिनेही लागत असतील.
 
परंतु, त्याच्या गुंतवणुकीबाबतचा निर्णय मात्र आपण केवळ पाच मिनिटांतच घेताे. गुंतवणुकीचा विचार करताना केवळ सुरक्षिततेचा विचार करून चालणार नाही, तर त्यामध्ये प्रामुख्याने पुढील तीन गाेष्टींचा एकत्रित विचार करणे आवश्यक असते. परतावा, तरलता म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा पैसे मिळण्याची हमी आणि सुरक्षितता.पूर्वीच्या काळी सर्वसामान्य गुंतवणूकदार हा केवळ परताव्यासच शंभर टक्के महत्त्व देत हाेता.कालांतराने परताव्यास 70 टक्के, तर सुरक्षिततेस 20 टक्के व तरलतेस 10 टक्के महत्त्व असा ट्रेंड सुरू झाला. जेथे जास्त व्याजदर तेथे पटकन गुंतवणूक केली जात हाेती. परंतु, जसजशी स्पर्धा वाढत गेली, तसतशी सुरक्षिततेस 70 टक्के, तर परताव्यास 20 टक्के व तरलतेस 10 टक्के असे महत्त्व येऊ लागले. मात्र, ज्या प्रमाणात सध्या आर्थिक संस्था डबघाईस येत आहेत, गुंतवणूकदारांना हवे तेव्हा पैसे मिळतील याची खात्री वाटेनाशी झाली आहे, तेथे आज सुरक्षिततेला 70 टक्के, तर तरलतेला 20 टक्के व माेबदल्यास 10 टक्के महत्त्व आल्याने आर्थिक गुंतवणुकीचे चक्र पूर्णपणे उलटे फिरल्याचे दिसून येते.