राज्यातील 39 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

आचारसंहिता शिथिल झाल्याने लवकरच प्रक्रिया होणार सुरू : सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश जारी

    11-Jun-2024
Total Views |
 
 
sa
पुणे, 10 जून (आ.प्र.) :
 
लोकसभा निवडणुकीसाठी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी अधिग्रहीत केल्या होत्या; तसेच सहकार विभागातील तालुका, जिल्हा पातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे निवडणुकीला पात्र असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवण्यात आली असून, राज्यातील सुमारे 39 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी जारी केला आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या टप्प्यापासून त्या सुरू करण्यात येणार आहेत.
 
राज्यात 31 डिसेंबर 2023 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या 93342 सहकारी संस्थांपैकी 50238 संस्थांची निवडणूक पूर्ण झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या 10783 संस्था आहेत. प्रलंबित 20130, तर चालू वर्षी निवडणुकीस पात्र 7827 अशा एकूण 38740 संस्थांची निवडणूक प्रक्रिया आता सुरू होईल. ‌‘अ' आणि ‌‘ब' वर्गातील सहकारी संस्थांचा सुरू असलेला निवडणूक कार्यक्रम ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आला आहे, त्या सहकारी संस्थांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम तयार करून सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. ‌‘क' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाला तालुका किंवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्तरावर मान्यता देण्यात यावी. निवडणुका पुढे ढकलण्यापूर्वी ‌‘ड' वर्गातील सहकारी संस्थांसाठी प्राधिकरणाने प्राधिकृत अधिकारी नियुक्तलीा मान्यता दिली; पण त्या सहकारी संस्थांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा झाली नाही. अशाप्रसंगी विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस देऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आदेशात म्हटले आहे.