मोहोळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल

    11-Jun-2024
Total Views |
 
 
moh
पुणे, 10 जून (आ.प्र.) :
 
 पुणे लोकसभा मतदारसंघातील निर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची थेट केंद्रातील मंत्रिपदी वर्णी लागली आहे. स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौरपदानंतर थेट केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने पुण्याच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीच्या काळात विठ्ठलराव गाडगीळ, शरद पवार, सुरेश कलमाडी या पुणे जिल्ह्यातील खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली होती, तर मागील टर्ममध्ये मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेलेले; परंतु मूळचे पुण्याचे प्रकाश जावडेकर यांनी केंद्रात मंत्रिपद भूषविले आहे. प्रामुख्याने देशात आठव्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुणे शहराला मात्र सुरेश कलमाडी यांच्यानंतर मंत्रिपद मिळाले आहे.
 
पुण्याचा विचार करायचा झाल्यास सुरेश कलमाडी यांनी मंत्रिपदाच्या काळात शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला. युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने म्हाळुंगे बालेवाडी येथे श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाची निर्मिती असो अथवा शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटिकरण मोठ्या प्रमाणावर झाले. बीआरटी प्रकल्पही सुरेश कलमाडी यांच्याच काळात साकारला गेला. दिल्लीतील वर्तुळातील संबंधही यासाठी उपयोगी ठरले. त्यामुळे साधारण दोन दशके पुण्याच्या राजकारणावर त्यांचे वर्चस्व राहिले; परंतु दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेतील कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून त्यांना अटक झाली आणि काँग्रेसने त्यांना बाजूला केले. कलमाडी यांच्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी शहरात लक्ष घातले. त्यात त्यांना काहीकाळ यशही आले; परंतु 2014 नंतर मोदींच्या करिष्म्यापुढे अजित पवार यांचेही नाणे फिके पडले. केंद्र आणि राज्यातील सत्तेपाठोपाठ महापालिकेतही भाजपने प्रथमच एकहाती सत्ता खेचून आणली. भाजपच्या सत्ताकाळात रखडलेला मेट्रो, नदीसुधार आणि नदीकाठ सुधार प्रकल्पांच्या कामांना गती मिळाली. चोवीस तास पाणीपुरवठा आणि पीएमपीचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात आली. योगायोगाने या कालावधीत महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर असा सुमारे साडेतीन वर्षे प्रमुख पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मोहोळ यांना मिळाली.
 
या प्रकल्पांसोबत महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू करण्यात मोहोळ यांनी पुढाकार घेतला. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात आरोग्यव्यवस्था चांगली राहील यासाठी त्यांनी कटाक्षाने प्रयत्न केले. याचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. मोहोळ यांच्या कामाचा धडाका पाहूनच पक्षात स्पर्धा असतानाही भाजपकडून त्यांना पहिल्याच यादीत लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत सव्वा लाखाहून अधिक मतांनी विजय मिळविला. या विजयाचा गुलाल उतरत नाही, तोच पक्षाने त्यांना मंत्रिपदी संधी दिल्याने दुधात साखर पडली आहे. मंत्रालयाचा कारभार सांभाळतानाच पुणे शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होईल. केंद्रीय तसेच राज्यपातळीवर तांत्रिक बाबींसाठी अडकलेल्या प्रकल्पांचादेखील पाठपुरावा करून त्यांना गती मिळेल. पुणेकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करतील, अशी सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे.
 

moh1 
खऱ्या अर्थाने पुण्याने दिवाळी साजरी केली :
घाटे खासदार मुरलीधर मोहोळ मंत्री झाल्यामुळे शहरात जल्लोष करण्यात आला. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत, याचा मनस्वी आनंद होत आहे. पुणेकरांसाठी आज दुग्धशर्करा योग आहे. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ हेसुद्धा मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. याचा एक पुणेकर म्हणून नक्कीच अभिमान आहे. आज पुणेकरांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने पुण्याचे विकासपर्व सुरू झाले आहे. पुण्यात विविध योजना केंद्रातून मंजूर करून पुणेकरांचे जीवन मोहोळ सुखदायी करतील हा विश्वास आहे, असे प्रतिपादन शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले स. प. महाविद्यालय चौकात भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी 100 किलो जिलबीचे वाटप घाटे यांच्या हस्ते पुणेकरांना करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह माजी नगरसेवक अजय खेडेकर, सम्राट थोरात, दिलीप काळोखे, मनीषा घाटे, धनंजय जाधव, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते.