जटोली शिवमंदिरात विराजमान होणार दगडूशेठचे बाप्पा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा उत्साहात शुभारंभ

    11-Jun-2024
Total Views |
 
dag
 
पुणे, 10 जून (आ.प्र.) :
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टतर्फे 132व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आशियातील सर्वांत उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट साकारणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक अमन विधाते आणि दीपाली विधाते यांच्या हस्ते पार पडला.
 
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हिमाचल प्रदेशातील लनमधील जटोली शिवमंदिर डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे. ‌‘जटोली' हे नाव महादेवाच्या लांब जटांवरून पडले आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. पुराणातील उल्लेखानुसार भगवान शिवाच्या सर्वांत प्राचीन मंदिरांपैकी एक असून, हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते असे मानले जाते. जटोली मंदिर विशिष्ट अशा दक्षिण-द्रविड वास्तुशैलीत बांधले गेले आहे आणि ते सलग तीन पिरॅमिडने बनलेले आहे.
 
पहिल्या पिरॅमिडवर गणेशाची प्रतिमा, तर दुसऱ्या पिरॅमिडवर शेषनागाची प्रतिमा दिसते. हे मंदिर बांधण्यासाठी 39 वर्षे लागली आहेत. या मंदिराची उंची अंदाजे 111 फूट आहे. मंदिरातील दगडांवर थाप मारल्यावर डमरूसारखा आवाज येतो. ते भव्य दिव्य मंदिर लक्षात घेऊन यंदाच्या गणेशोत्सवात जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून, मंदिराचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रंद आणि 111 फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येणार असून, त्यावर रंगकाम करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.