शिबिरात 46 महिलांची कर्करोग तपासणी

रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्सचा पुढाकार

    11-Jun-2024
Total Views |
 
 
shi
पुणे, 10 जून (आ.प्र.) :
 
रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब (सहकारनगर) आणि ‌‘लायन्स राहतेकर वूमन कॅन्सर डायग्नॉस्टिक सेंटर' (एलआरसीसी) यांच्यातर्फे आयोजित शिबिरात स्त्री रोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 46 महिलांची मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली. हे शिबिर रविवारी (9 जून) सकाळी 10 ते 2 या वेळेत मामलेदार कचेरीसमोर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र भट्टड, तसेच तरुण लेखक तुषार मालानी उपस्थित होते. मधुकर राऊत, शारदा लडकत, राम बांगड यांनी मार्गदर्शन केले. महात्मा फुले मंडळ (पुणे) यांचे या शिबिराला सहकार्य लाभले. राजेंद्र भट्टड म्हणाले, ‌‘महिलांच्या कर्करोग तपासणीचे असे उपक्रम घेणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेवर निदान झाले, तर अनेक भगिनींना चांगले जीवन जगता येईल. त्यातून अनेक कुटुंबांना स्वास्थ्य लाभेल.' या कार्यक्रमात तरुण लेखक तुषार मालानी यांच्या ‌‘नो इडियट टॉक' या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी टीव्ही आणि मोबाइलमुळे मुलांच्या मनावर आणि शरीरावर होणाऱ्या वाईट परिणामांचे कथन केले.
 
‌‘महिलांमधील कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने वेळीच तपासणी करून घ्यावी. दर पंधरा दिवसांनी असे तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. शिबिराचा लाभ घेत महिलांनी आवर्जून तपासणी करून घ्यावी,' असे आवाहन राम बांगड, चंद्रकला बांगड, अवंतिका सोनावणे यांनी केले.