व्यक्तिकेंद्रित राजकारण लोकशाहीसाठी धोक्याचे : वानखेडे

मान्यवरांच्या हस्ते सुनील माने यांच्या ‌‘प्रभावांचा प्रवास" पुस्तकाचे प्रकाशन

    07-May-2024
Total Views |

wa 
 
पुणे, 6 मे (आ.प्र.) :
 
‘व्यक्तिकेंद्रित राजकारण लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. व्यक्तिवादामुळे भविष्यात देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते,' असे परखड मत झुंजार आणि निर्भीड पत्रकार अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने लिखित ‌‘प्रभावांचा प्रवास' या पुस्तकाचे प्रकाशन वानखेडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र टाइम्स पुणेचे निवासी संपादक श्रीधर लोणी, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, जितेंद्र भुरूक, अशोक सोनावणे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वानखेडे म्हणाले, ‌‘लोकशाही भक्कम करण्यासाठी पत्रकाराने नेहमी सत्तेच्याविरोधात असले पाहिजे.
 
सत्ताधारी आणि विरोधक यापलीकडे जाऊन विचार करण्याची भूमिका आणि क्षमता पत्रकारामध्ये असली पाहिजे; तसेच त्याचा चौफेर अभ्यास असला पाहिजे. सुनील माने यांची अशाप्रकारची पत्रकारिता मी दिल्लीमध्ये असताना जवळून अनुभवली आहे. त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील चतु:रस्त्र लिखाणावरून त्यांच्या लेखनाची व्याप्ती दिसून येते. दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रापासून ते काश्मीरच्या निवडणुकीपर्यंत, वीरप्पनच्या खात्म्यापासून इस्राईलच्या प्रगत शेतीपर्यंत, भूपेन हजारिका यांच्या मुलाखतीपासून ते दिल्लीतील राजकीय वार्तांकनापर्यंत सगळे विषय सुनीलने लीलया हाताळले. पत्रकारिता सोडल्यानंतर राजकीय जनसंपर्काचा व्यवसाय करताना गिरीश बापट व अन्य नेत्यांच्या माध्यमातून त्यांनी पुण्याचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.'
 
आवटे म्हणाले, ‌‘सुनील माने यांनी या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आणि घटनांवर आपले सखोल व प्रामाणिक मत मांडले आहे. समतेसाठी झगडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अब्राहम लिंकन या महापुरुषांविषयी असणारे लेख वाचनीय आहेत. बाबासाहेबांनी ‌‘मूकनायक'ची सुरुवात तुकारामांच्या अभंगाने केली होती. डॉ. बाबासाहेबांनी पहिला सत्याग्रह छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाडमधून केला होता. त्यामुळे जातीधर्माच्या पलीकडे जाऊन ते देशातील सर्व नागरिकांसाठी कार्यरत होते. सध्या जगाची वाटचाल कट्टरतेकडून अतिकट्टरतेकडे चालली आहे. सध्या सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणे सुद्धा देशविरोधी ठरत आहे.'
 
त्याकाळी मात्र डॉ. बाबासाहेबांनी विरोधकांना उद्देशून तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी दिवसरात्र अभ्यास करेन, मात्र तुमचा मुद्दा मांडू देण्यासाठी जीवाची बाजी मांडेन, असे उद्गार काढल्याची आठवण त्यांनी करून दिली.' प्रस्तुत पुस्तकातील लेख वाचताना मानवाच्या भावविश्वाची स्पंदने आपल्याला स्पर्शून जातात, असे सांगत अरुण खोरे यांनी पुस्तकातील लेखांचा आढावा घेतला; तसेच त्यांच्या आईविषयीच्या लेखाचे स्वतंत्र पुस्तकरूपी स्वरूप आम्हाला वाचायला आवडेल, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी माने यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल गायकवाड यांनी केले. दीपक म्हस्के यांनी आभार मानले.