बारामती निवडणूक मतदानासाठी कामगारांना पूर्ण पगारी सुट्टी

    06-May-2024
Total Views |
 
v
 
पुणे, 5 मे (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुणे जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघात मंगळवार दिनांक 7 मे रोजी मतदान होणार असून, मतदारसंघातील सर्व आस्थापनांनी कामगारांना मतदानासाठी भर पगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आणि पुणे शहराशी संलग्न असलेल्या भागातील नागरिकांनी मतदान केंद्राची माहिती घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही डॉ. दिवसे यांनी केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. भोर विधानसभा मतदारसंघात म्हाळुंगे, सूस व बावधन, ताथवडे, हिंजवडी, पिरंगुट, मान, भुकूम, भुगाव, लवळे; तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात कात्रज, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, वारजे, शिवणे-खडकवासला, खेड-शिवापूर, बिबवेवाडी (काही भाग) या शहरी भागाचा समावेश करण्यात आलेला आहे. या भागातील मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी मतदान केंद्राच्या माहितीसाठी जवळचे मतदान केंद्र किंवा मतदान सहायता कक्षाशी संपर्क साधावा. निवडणूक आयोगाच्या https:// electoralsearch.eci.gov.in/ pollingstation या लिंकवर क्लिक करून आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती घेता येईल. वोटर हेल्पलाइन ॲपवरही मतदान केंद्राची माहिती घेता येईल. बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागासह शहराशी संलग्न भागात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत असलेल्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्याचे निर्दे श जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.