अहंकाराच्या अतिरेकामुळे अनेकजण एकाकी

    06-May-2024
Total Views |
 
 
 

thoughts 
माणसाचा सर्वांत माेठा शत्रू असेल तर ताे म्हणजे अहंकार. कुणाला संपत्तीचा अहंकार, तर कुणाला विद्वत्तेचा. कुणाला पदाचा, तर कुणाला कर्तृत्वाचा. अहंकारामधील मूळ शब्द अहम् हा आहे. काेणत्याही व्यक्तीला अहम् भावना ही कार्याेद्युक्त करीत असते, यात शंका नाही. अहम् सुखावला की माणूस पाऊल पुढे टाकताे आणि त्याच्या अंगात उत्साह संचारताे. एवढ्या मर्यादित अर्थानं अहंभाव याेग्यच आहे. सामान्य संसारी माणसांना भाैतिक जीवनात यश संपादन करण्यासाठी हा अहम् उपयाेगी आहे. मात्र, त्याचा अतिरेक झाला तर ताेच अहम् स्वत:च्या आणि इतरांच्याही नाशाला कारणीभूत हाेताे.
 
मात्र, अभिमानाच्या जाेडीला विनयशीलता नसेल तर त्याचं रूपांतर अहंकारात हाेतं. अहंकार तपश्चर्येचाही असताे. हिरण्यकश्यपूला असा अहंकार झाला हाेता म्हणून तर नृसिंहाला प्रकट हाेऊन त्याचं उदरविदारण करावं लागलं. अहंकाराचा शेवट विनाशच असताे. प्रत्येकांबद्दल आदर बाळगणे, काेणालाही हीन न लेखणे, मानसिक वा शारीरिक इजा न करणे, दुसऱ्यांच्या भावना जाणून घेणे, खाेट्या प्रतिष्ठेला वा वरवरच्या गाेष्टींना न भुलणे, षडरिपुंवर विजय मिळविणे आणि मुख्य म्हणजे कसलीही पूर्वअट न ठेवता सर्वांवर प्रेम करणे म्हणजे चांगला माणूस हाेणे. ही अर्थातच अवघड अशी साधना आहे. म्हणूनच चांगला माणूस घडण्याची प्रक्रिया अखंड चालणारी आहे.
 
ह्या अहंकाराच्या अतिरेकामुळे अनेक जण एकाकी, एकांगी, हतबल, निरुत्साही, नैराश्यग्रस्त व हिंसाचारी बनत आहेत, हे खरे. मेल इगाे म्हणजेच पुरुषी अहंकार हा अहंकाराचा एक प्रकार आपण पाहताे, ज्याचा अनुभव प्रत्येक महिलेने घेतलेला असताेच. पुरुषांना तर स्वत:वर जास्त काम करण्याची गरज आहे.विधायक अहम् म्हणजे अभिमान! विघातक अहम् म्हणजे अहंकार! जीवन जगायचं असेल तर अहम् चे मीठ प्रमाणात असावं. त्याला अभिमान म्हणतात. अभिमानाचं मीठ अतिप्रमाणात झालं तर त्याला अहंकार म्हणतात. साधक काय समजायचं ते समजला. म्हणून संतांनी म्हटलंय, अहंकाराचा वारा न लागाे माझ्या चित्ता.अहंकारानं उन्मत झालेल्या गर्वाेन्नतांच्या माड्या केव्हाच काेसळतात आणि या उलट नम्रता आणि विनय यांनी ज्याचं जीवन समृद्ध झालंय ते टिकून राहतात. नम्रता म्हणजे लाचारी नव्हे, विनय म्हणजे भित्रेपणा नाही. नम्रता आणि विनयशीलता यांच्याबराेबरीने अभिमानही असू शकताे.