कामगार दिनािनमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

    06-May-2024
Total Views |
 
p
 
पुणे, 5 मे (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पुणे महापालिकेच्या 30 सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी अहोरात्र झटत असतात. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. अभिजित सोनावणे आणि डॉ. मनीषा सोनावणे यांनादेखील ट्रस्टच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. डॉ. सोनावणे हे रस्त्यावरील भिक्षेकरी आणि अनाथ लोकांवर मोफत उपचार करतात; तसेच त्यांना छोट्या व्यवसायासाठीदेखील मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करतात. महापालिकेच्या सफाई कामगार विभागातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अशोक बडगर व गाडगीळ शाळा मुकादम लक्ष्मण चव्हाण यांनी सफाई कामगारांचा सत्कार केल्याबद्दल ट्रस्टचे आभार मानले. यावेळी जिजामाता आरोग्य कोठीचे कामगार, मुकादम यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
p1 
 
नागरिकांना आरोग्यसेवा देण्याचे मोठ काम सफाई कर्मचारी वर्षभर अव्याहतपणे करत असतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्याची संधी ट्रस्टला मिळणे, हा एकप्रकारे ट्रस्टचा सन्मानच आहे. शहराच्या स्वच्छतेत सफाई कामगार हा महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट नेहमीच या कर्मचाऱ्यांसोबत राहील.
                                                                  -पुनीत बालन (उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)