सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात कार्यरत ः सुनेत्रा पवार

    05-May-2024
Total Views |
 
aaa
 
  सुनेत्रा पवार
 
महायुतीच्या उमेदवार 
 
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार शांत, विवेकी, माणुसकी आणि कुलीनतेचे मिश्रण आहेत. शेतकऱ्याची कन्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी, पार्थ आणि जय यांची आई असलेल्या सुनेत्रा पवार एक सामाजिक आणि व्यावसायिक उद्योजकही आहेत. महायुतीच्या माध्यमातून बारामती लोकसभेसाठी त्या खासदार पदासाठी बारामतीतूनच निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या जीवनकार्याविषयी ‘दै. संध्यानंद' प्रतिनिधीशी वार्तालाप करताना त्यांनी सविस्तर माहिती दिली...
 
 
प्रश्न ः निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उभ्या राहिला आहात. खासगी जीवन आणि आता राजकारण याचा मेळ कसा घालणार?
 
- बारामतीच्या पवार घराण्याची सून म्हणून अभिमान आहे. उपमुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून अनेक वर्षांपासूनच राजकारण घरातच पाहते आहे. वडील निंबाळकर धाराशिवजवळील तेर गावचे. तेथेही राजकारण आहेच, त्यात दोन्हीकडे कुटुंब एकत्र असल्याने अनेक गोष्टीं लहानपणापासूनच माहीत आहेत. मोठ्या परिवाराची सवय आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी माहेरी आणि सासरी दोन्हीकडे बाहेर पडण्याची सवय आधीपासूनच आहे. आता फरक असा आहे की, यंदा स्वतःसाठीच प्रचार करावा लागतो आहे.
 
प्रश्न ः अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. उदा. मातीचे खेळ या संकल्पनेबाबत काय सांगाल?
 
- राजकारणापेक्षा सामाजिक क्षेत्रात काम करताना एक वेगळाच आनंद मिळतो. अलीकडच्या काळात लहान मुले मोबाइलमध्ये अधिक गुंतली आहेत. कोरोनानंतर यात अधिकच भर पडली आहे. शिक्षणसुद्धा त्यावेळी मोबाइलवरून घेण्यात आले. मोबाइलपासून मुलांना काहीकाळ दूर राहता यावे यासाठी ‘मातीचे खेळ' किंवा ‘खेळांची जत्रा' हा उपक्रम अनेक वर्षांपासून मुलांसाठी राबवला जातो आहे. मी 2010 पासून ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया'ची संस्थापक आहे. 13 वर्षांपासून पर्यावरणपूरक उपक्रम या माध्यमातून चालवले जातात. त्यातूनच मुलांसाठी पाण्याची बचत करा, पर्यावरणाचे संरक्षण, मुलांच्या आरोग्यसमस्या आदी बाबींचा विचार करून मुलांसाठी ‘मातीची जत्रा' सुरू केली आहे. मुलांनी मोबाइलपासून दूर राहून आपले जुने खेळ, जसे लगोरी, भोवरा, विटी-दांडू, गोट्या आदी खेळांचा समावेश यात केला आहे. यादरम्यान जुन्या काळातील या खेळातील निष्णात मुलांना हे खेळ शिकवतात. दोन तासांचा मुलांचा वेळ चांगला जातो, याचबरोबर त्यांना उपलब्ध रानमेवा देण्यात येतो. यामुळे जुन्या खेळांची त्यांना ओळख होते, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये अजून एक असे आहे की, लुप्त होत चाललेल्या वन्यजीवांच्या प्रजाती, पाणी आणि दुष्काळग्रस्त प्रदेशांमध्ये ‘फोरम'द्वारे संवर्धन संदेश पसरवण्याची त्यांची इच्छा आहे, या संस्थेला ‘ग्रीन वॉरियर ॲवॉर्ड' मिळाले आहे.
 
प्रश्न ः ॲग्रो टुरिझम, इको-व्हिलेज संकल्पना रुजवण्यात तुमचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, याबाबत काय सांगाल?
 
- भारत ही खेड्यांची भूमी आहे. येथील शेतकरी हा बऱ्याचदा पावसावर अवलंबूनच शेती करतो. अनेक शेतकऱ्यांकडे जमिनीचे छोटे तुकडे आहेत. मात्र, आर्थिक अडचणींमुळे हे तुकडे विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. जमीन न विकणे आणि तिची उपयोगिता योग्य पद्धतीने व्हावी यासाठी संस्थापक-अध्यक्ष या नात्याने ‘महाराष्ट्र ॲग्रो टुरिझम' या उद्योगाची निर्मिती केली. या माध्यमातून अलीकडच्या काळात ‘ऑर्गेनिक फूड'ची क्रेझ आरोग्याच्या दृष्टीने लोकांमध्ये वाढते आहे. या गोष्टीचा विचार करता पर्यटन या व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळणे गरजेचे आहे. यामध्ये रोजगारनिर्मिती आणि आर्थिक सुबत्ता निर्माण होत आहे. ‘गावाकडे चला' ही मानसिकता आता वाढते आहे. त्यातच सुट्यांच्या काळात गावाकडे पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याने ‘ॲग्रो टुरिझम'चा विचार करून शेतकऱ्यांनी ‘ॲग्रो पर्याटन' या क्षेत्रात वळावे यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
 
प्रश्न ः कौटुंबिक जबाबदारी, राजकारण आणि कामाची दिशा कशी असेल?
 
- बारामती, पुणे आणि मुंबई अशा तीनही ठिकाणी राहण्याची सवय आहे. त्यात घरात नेहमीच राजकारणी लोकांचा वावर असतो. दादांची शिस्त आणि स्वच्छता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या समोर ठेवल्या की काम सोपे होते. वैयक्तिक जीवनात साधे राहणे आवडते. जेवण साधे आणि विशेषतः नॉनव्हेज असेल तर अधिक आवडते. संगीताची आवड आहे, प्रवासही खूप आवडतो. प्रवासादरम्यान संगीत ऐकता येते. किशोरकुमार, आशा भोसले, अरजित सिंग, सोनू निगम यांची गाणी विशेषत्वाने आवडतात. याबरोबरच अगदी गाड्यावर जाऊन पाणीपुरी-भेळ, वडापाव खायलाही आवडतो. स्वतः भाजी खरेदी करताना वेगळा आनंद मिळतो. आता राजकारणात उतरले आहे, त्यामुळे पुढचे ध्येय हे प्रचारानंतरच ठरवता येणार आहे.
 
प्रश्न ः महिला सक्षमीकरण, हे तुम्ही तुमचे प्रमुख उद्देश सांगितले. याबाबतचे तुमचे विचार सांगा.
 
- महिला सक्षमीकरण आणि त्याकडे आर्थिक स्वयंपूर्णता येण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. ‘बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क'ची मी चेअरपर्सन आहे. त्यामुळे या माध्यमातून 3 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. असे 11 कारखाने आहेत. या महिलांचे शिक्षण कमी आहे, पर्यायाने लोकांकडे घरकाम करून उदरनिर्वाह करावा लागत होता. मात्र, आता ‘टेक्स्टाईल पार्क'वर हायटेक मशीनवर शिवणकाम करीत आहेत. त्या नगावर कौशल्यपूर्ण काम करीत असून, महिला 30 ते 50 हजार रुपये सहज कमवत आहेत. स्वतःच्या वाहनाने कामावर येत आहेत, अर्थात त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. कुटुंबात व समाजातही त्यांचा सन्मान उंचावला आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाचे आहे.
 
प्रश्न ः काटेवाडीला ‘निर्मलग्राम' पुरस्कार मिळाला आहे, तसेच इतरही अनेक पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत, याविषयी थोडेसे... -
 
महाविद्यालयीन जीवनापासूनच अनेक पुरस्कार मिळाले आहेत. स्वच्छता हा गुण अजित पवार (दादांकडून) यांच्याकडून घेतला आहे. निर्मल ग्राम योजनेची माहिती मिळाली होती. त्यात उतरायचे ठरवले आणि निर्मल ग्राम योजना आणि संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान या स्पर्धेमध्ये काटेवाडीने सहभाग नोंदवला. यावेळी झालेल्या सर्व्हेत असे लक्षात आले, की गावात 80 टक्केलोकांकडे स्वच्छतागृहच नाहीत आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्याचा वापर ‘स्टोअर रूम' म्हणून किंवा गोठ्यासाठी केला होता. याबाबत प्रबोधन करावे लागले, याचबरोबर कचरा व्यवस्थापनही केले आणि 2008 चा निर्मल ग्राम पुरस्कार काटेवाडीला मिळाला.
 
प्रश्न ः या सर्व गोष्टी समाजकारणाशी निगडित आहेत, राजकारणात आता कसे कार्य होणार, यात मुलांचा सहभाग किती आहे?
 
- समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आता आधी प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रचार संपल्यानंतर बाकीच्या गोष्टींचा विचार होईल. प्रचारात पार्थचे नियोजन खूप उपयोगाला येत आहे. त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि ती तो पूर्णपणे सांभाळतो आहे. आता मुलं मोठी झाली आहेत आणि त्यांना त्यांची जबाबदारी समजते आहे. मी दैववादी आहे. ईश्वर नावाच्या शक्तीला मानते, तेच सर्वांचे सुरक्षाकवच असते.