आईकडूनच आपल्याला बचतीचे धडे मिळतात

    27-May-2024
Total Views |
 
 

finance 
 
जागतिक मातृदिन नुकताच झाला. आईची महती काेणाला वेगळी सांगण्याची गरज नाही. आई आहे म्हणून आपण आहाेत एवढे सांगितले तरी पुरे. बालपणी आपली काळजी घेणारी आई आपल्या प्राैढपणीसुद्धा तेवढीच आपल्यासाठी झटत असते. बालकाच्या जडणघडणीत आईची भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरते. ती माया करते आणि रागावतेही. पण, त्यात आपल्या बाळाचे भले व्हावे हाच हेतू असताे. आईच्या वागण्यातून आपल्याला जगात वावरण्याचे काही धडे नकळत मिळतात. ते काेणते हे बघा.
 
बचतीचे महत्त्व : बालपणातील पिगी बँक बहुतेकांना आठवत असेल. सुटी नाणी आपण या बँकेत टाकायचाे आणि ते पैसे फक्त आपलेच असल्याची सुखद भावना त्यामागे असावयाची. ही बँक बहुदा आईने दिलेली असावयाची आणि त्यात टाकण्यासाठी नाणीसुद्धा तीच देत असे. यात बचतीची सवय लावणे हा माेलाचा धडा हाेता. घरखर्च गृहिणीच सांभाळत असल्याने त्यांना प्रत्येक रुपयाचे माेल माहीत असते. जीवनात पैशांचे महत्त्व किती आणि त्यासाठी बचत कशी गरजेची असते हेही त्या जाणतात. उज्ज्वल भवितव्यासाठी क्षणिक माेह टाळून पैसे वाचविण्याचा धडा पिगी बँकेत साठविलेली रक्कम देते.
 
समाधानी जीवनासाठी खर्चाचे बजेट : घरखर्च चालविण्यासाठी आपली आई कसे प्रयत्न करत हाेती हे आठवा. घरातील कमावत्या व्यक्तीचे उत्पन्न कमी असले, तरी आपली आई त्या पैशांतून संसार चालवत हाेती. आधी खर्चांचा अंदाज घ्यावयाचा, त्याची तरतूद करावयाची आणि प्रत्येक रुपया याेग्य कारणासाठीच खर्च हाेत असल्याची खात्री करणे असे उपाय ती अमलात आणावयाची.आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेतच खर्च करावा हा धडा आईकडून मिळत हाेता. प्राैढपणी तुम्हाला ही सवय फायद्याची ठरते. जमा आणि खर्चाचे बजेट तयार केल्यामुळे तुम्ही समाधानी राहता.चैन आणि गरज यांच्यातील फरक तुम्हाला समजायला लागताे.
 
आपत्कालीन निधी : वैद्यकीय अथवा अन्य काेणतीही आपत्कालीन स्थिती केव्हा उद्भवेल हे सांगता येत नाही आणि त्याला सामाेरे जाण्याची तयारी नसेल, तर चांगले उत्पन्न असणाऱ्यांचीसुद्धा तारांबळ उडते. हे टाळण्यासाठी हवी आपत्कालीन खर्चाची तरतूद असलेला निधी.मात्र, आपल्या आईला याची जाणीव असल्याने ती असा निधी तयार करते. हा धडा आपणही घेतला पाहिजे आणि काेणत्याही स्थितीत घरातील सर्व खर्च 3-6 महिने चालतील एवढा निधी कायम तयार ठेवायला हवा.
 
विचापूर्वक संपत्ती वाढविणे : बचत महत्त्वाची असली, तरी संपत्तीचे निर्माण करणेही आवश्यक असल्याचे प्रत्येक आई जाणते. त्यासाठी त्या बँकेत मुदत ठेवी, साेने घेणे अथवा रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक आदी उपाय करतात. लवकर सुरू केलेली गुंतवणूक नंतर माेठा फायदा देते हे तत्त्व माता जाणतात. शिक्षणाचा खर्च दीर्घकालीन असल्याने मूल लहान असतानाच आई त्यासाठी बचत सुरू करते हे त्याचे उदाहरण. आईचा हा आदर्श आपणही ठेवायला हवा. नाेकरी-व्यवसाय सुरू करताच आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी बचत आणि गुंतवणूक सुरू करावयास हवी. साेबतच निवृत्तीसाठीसुद्धा निधी उभारायला हवा. बचत अथवा गुंतवणुकीसाठी वेळ हा सर्वांत माैल्यवान घटक असल्याने जेवढ्या लवकर ती सुरू कराल, तेवढे जास्त फायदे तुम्हाला मिळतील हे लक्षात ठेवा.
 
खरेदीपूर्वी चाैकशी : काहीही घेण्यापूर्वी आपली आई आधी चार ठिकाणी चाैकशी केल्यावरच खरेदी करत असल्याचे तुम्हाला आठवत असेल. याचा फायदा म्हणजे संबंधित वस्तू थाेडी स्वस्त मिळून पैसे वाचणे. काहीही खरेदी करण्यापूर्वी थाेडी चाैकशी केली तर लाभच हाेताे. फक्त किराणा सामानाच्या खरेदीसाठीच नव्हे, तर माेटार अथवा घरासारख्या महाग वस्तू घेण्यासाठीसुद्धा हे धाेरण उपयुक्त ठरते. दरांची तुलना करून खरेदी केलीत, तर मार्केटिंग गिम्निसपासून तुम्ही लांब राहता.
 
भावनेपेक्षा मूल्य महत्त्वाचे : गरजा आणि चैन यांच्यातील फरक आईएवढा काेणाला चांगला समजत नाही. घरखर्च, अन्न आणि आराेग्याच्या खर्चांना त्यांचे प्राधान्य असते आणि चैनीसाठी खर्च करणे त्या टाळतात. भावनेच्या भरात खर्च न करता मूल्याला महत्त्व देण्याचा धडा आपल्याला आईच्या या वागण्यातून मिळताे.