सरकार करणार हटकेपर्यटन स्थळांचा विकास

    25-May-2024
Total Views |
 
 
 

tourism 
वाढत्या उन्हाबराेबर पर्यटनालाही जाेर आला आहे. शैक्षणिक संस्थांना सुट्ट्या असल्यामुळे लाेक सहकुटुंब घराबाहेर पडत आहेत. देशी पर्यटकांबराेबरच परदेशी पर्यटकही या काळात भारतात येतात. वास्तविक पाहता, पाश्चात्त्यांच्या दृष्टीने भारतातील उन्हाळा कडक असताे. त्यांना नेहमीएवजी अन्य स्थळांना जाता यावे म्हणून सरकार आता काही वेगळ्या स्थळांना प्राेत्साहन देत आहे. उन्हाळ्यातही हवामान सुसह्य असणे हे या स्थळांचे वैशिष्ट्य आहे.‘भारतातील उन्हाळा फार कडक असल्याची गैरसमजूत दूर करण्यासाठी आम्ही काही वेगळ्या स्थळी जाण्यासाठी परदेशी पर्यटकांना उत्तेजन देत आहाेत. आखाती देश, आग्नेय आशिया आणि आफ्रिकी देशांतील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आम्ही शांत, सुखद हवामान असलेली आणि हस्तकला, संस्कृती तसेच खाद्यपदार्थांसाठी ओळखली जाणारी ठिकाणे निवडत आहाेत.
 
त्यामुळे प्रसिद्ध स्थळांवरील गर्दीचा ताण वाढून इतरांनाही फायदा हाेईल,’ असे पर्यटन मंत्रालयाच्या महासंचालिका मनीषा स्नसेना यांनी सांगितले. उन्हाळ्यात सिमला, ैनिताल, मसुरी आणि मनालीसारख्या स्थळी पर्यटकांची गर्दी हाेते. आता हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग, किन्नाेर, डलहाैसी आणि तिर्थन, जम्मू-काश्मीरमधील पटणीटाॅप, उत्तराखंडातील औली, केरळमधील वायनाड, मिझाेराममधील तेन्झवाल आणि पश्चिम बंगालमधील कुर्सिआँग या स्थळांचा विचारही करता येताे. ‘कूल समर्स इन इंडिया’ या कार्यक्रमाखाली पर्यटन मंत्रालयाची संबंधित राज्य सरकारांबराेबर चर्चा सुरू असून, वेगळ्या पन्नास स्थळांची निवड करण्यात आली आहे. या स्थळांची माहिती देऊन पर्यटक तिकडे जावेत म्हणूनही प्रयत्न सुरू झाले आहेत, असे मनीषा स्नसेना यांनी सांगितले.
 
यातील काही पर्यटन स्थळांवर अद्याप पुरेशा पायभूत सुविधा नसल्या, तरी आतिथ्य क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रॅण्ड येथे आल्यावर पर्यटकांची गर्दी वाढून सुविधा विकसित हाेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकदा ही स्थळे विकसित झाल्यावर देशात वर्षभर परदेशी पर्यटक येत राहतील. त्यांना हाेम स्टेची सुविधाही दिली जाईल, असे त्या म्हणाल्या. दिल्ली आणि इतर शहरे तसेच अनेक राज्ये प्रदूषित हवेत घुसमटत असताना मिझाेराम मात्र स्वच्छ हवेसाठी प्रसिद्ध असल्याने तेथे पर्यटन वाढायला लागले आहे.मुख्यमंत्री झाेरामथांगा यांनी पर्यटनवृद्धीसाठी पुढाकार घेतल्याने हे राज्य पर्यटकांमध्ये प्रसिद्ध हाेऊ लागले आहे. काश्मीर पूर्वीपासूनच पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, 2023-24 या आर्थिक वर्षात या राज्याला पर्यटनातून 110 काेटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. पायाभूत सुविधांमध्ये हाेत असलेली वाढ, वाढता मध्यमवर्ग आणि विमान प्रवासाच्या सुविधेमुळे भारतात पर्यटन वाढत असल्याचे ‘ट्रॅव्हल एजंट्स असाेसिएशन ऑफ इंडिया’च्या अध्यक्षा ज्याेती मायाल यांनी नमूद केले.
 
प्रख्यात स्थळांबराेबरच अन्य अप्रसिद्ध स्थळांचाही विकास केल्यास, आंतरराष्ट्रीय पर्यटक वाढतील, असे त्या म्हणतात. भारतात येणारे परदेशी पर्यटक वाढत आहेत. 2023मध्ये 92,36,108 पर्यटकांनी जानेवारी-डिसेंबर या काळात भारताला भेट दिली हाेती. 2022मध्ये हीच संख्या 64,37,467 हाेती, असे पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिसते. कडक उन्हाळ्यात थंड स्थळी जावेसे वाटणे साहजिक आहे आणि सिमला त्यात अव्वल. पण, वाढते शहरीकरण, पाण्याची टंचाई, रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी या तेथील समस्या आहेत. मात्र, पर्यटक आता अन्य ठिकाणांचाही विचार करतात. ‘बुकिंग.काॅम’च्या भारत श्रीलंका, मालदीव आणि इंडाेनेशिया या विभागांचे प्रमुख संताेष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळ्यात तमिळनाडूतील उटी हे स्थळ पर्यटकांच्या सर्चमध्ये अव्वल ठरले आहे. मनाली, काेडाईकनाल, दार्जिलिंग, ऋषिकेश, मुन्नार, श्रीनगर आणि लाेणावळ्याचा सर्चही वाढल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेश ही पर्यटकांची उन्हाळी सुटीसाठीची आवडती ठिकाणे आहेत, असे ते म्हणाले.