केवळ एक शब्द सासू, याविषयी सुनेच्या मनात अनेक चित्र-विचित्र विचार असतात. कारण हा शब्द अनेक गैरसमजांनी भरलेला आहे. तक्रारी, सूचना, व्यवहारातील थंडपणा याने ताे ग्रस्त आहे. एका नव्या सुनेसाठी हे खूप आवश्यक आहे की, आपल्या सासूला समजून घेणे. तसंच तिचा निर्णय, मत विचारात घेणे.स्वतःचं महत्त्व बाजूला सारून दुसऱ्याला महत्त्व देणे.सुनेने हा विचार मनातून काढायला हवा की, सासू नेहमी अत्याचार करणारीच असते.
सकारात्मक सुरुवात : एका सुनेला आपल्या सासुबराेबरच्या संबंधांची सुरुवात सकारात्मक दृष्टिकाेनाने करायला हवी. त्यासाठी सगळ्यात आधी सासुचा स्वभाव आणि वागणूक याविषयी समजून घ्या.त्यानंतर त्याअनुरूप काम करण्यास सुरुवात करा. एका आईच्या आयुष्यात मुलाच्या लग्नाचा क्षण खूप आनंदाचा असताे. त्या क्षणीच ती हे जाणते की, सून आता आपल्या मुलाच्या आयुष्यातील आपली जागा घेणार आहे. आपलं महत्त्व आता कमी हाेणार आहे. म्हणूनच सासू अनेकदा आपल्या सुनेला घरातील काम करू देत नाही. ती हे दाखवू इच्छिते की, घरात तीच जास्त महत्त्वाची आहे.जर सुनेने आपल्या वागणुकीत संयम आणि संतुलन टिकवून ठेवले तर तिला काही दिवसातच हे जाणवेल की, आपणही या कुटुंबातील एक महत्त्वाचा भाग आहाेत.
वागणूक चांगली असावी : अनेकदा सासू-सुनेतील छत्तीसच्या आकड्यासाठी ईगाे कारणीभूत ठरताे. अशावेळेस सुनेने समजुतीने घ्यायला हवे. सुरुवातीच्या दिवसात प्रत्येक काम सासुला विचारून करावं. यामध्ये अजिबात दुमत नाही की, स्थिती सामान्य हाेण्यास वेळ लागताे.म्हणून नम्रता आणि धैर्य याने काम करा. तुमची वागणूक चांगली असेल तर नवीन घर आणि त्या घरातील माणसं तुम्हाला निश्चितपणे आपलंसं करतील यांत शंकाच नाही.