अनधिकृत बांधकाम कारवाईचा अहवाल दरमहा द्यावा लागणार

    22-May-2024
Total Views |
 
ill
 
पुणे, 21 मे (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
रविवारी मध्यरात्री कल्याणीनगर येथील बॉलआर पबसमोर बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या कारच्या धडकेत तरुणीसह दोघांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने प्रशासन जागे झाले आहे. महापालिकेनेही आज अपघाताच्या निमित्ताने पब, हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या दृष्टीने तपासणी करण्याचे आदेश दिले असून, बॉलआर पबच्या पाहणीसाठी देखील पथक पाठविले होते; तसेच बांधकाम विभागाच्या वतीने अनधिकृत बजावण्यात आलेल्या नोटिशीवर काय कारवाई करण्यात आली, याचा अहवाल दर महिन्याला स्थायी समितीसमोर ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
 
कल्याणीनगर येथे झालेल्या दोन जणांच्या अपघाती मृत्यूनंतर शहरातील पब आणि रूफटॉप हॉटेलचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. कल्याणीनगर भागातील नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पबचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या संदर्भात कल्याणीनगर सिटीझन फोरम या संघटनेने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. पबप्रमाणेच रूफटॉप हॉटेलही रात्री उशिरापर्यंत सुरू असतात, या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईसंदर्भात माहिती घेतली असता, पोलिसांना पाठविण्यात आलेल्या पत्राची पत्र मिळाली. शहराच्या विविध भागांत इमारतींच्या टेरेसवर तसेच सामाईक जागेत शेड उभारून हॉटेल व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो, तसेच रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू राहतात. या भागातील नागरिकांना त्याचा उपद्रव होतो.
 
पार्किंग, ध्वनिप्रदूषण या संदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येतात. याची दखल घेत महापालिकेने रूफटॉफ हॉटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. शहरातील 89 अनधिकृत रूफटॉप हॉटेलपैकी 76 हॉटेल्सला नोटिसा पाठविण्यात आल्या. त्यापैकी 53 हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सहा हॉटेलमालकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेतले आहे. सात हॉटेल्सचा वापर बंद झाला आहे. सात हॉटेल्स मालकांनी कारवाईला स्थगिती मिळविली आहे; तसेच नऊ हॉटेल्सवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम-52 नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या हॉटेल्सवर गुन्हा नोंदवूनही त्याचा पुन्हा वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेने पुणे पोलिसांना दिले होते. त्यावर अद्याप कारवाई झाली नाही.
 
फौजदारी कारवाई करण्याची मागणी :
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमानुसार गुन्हा नोंदविल्यानंतरही जागेचा अनधिकृतपणे वापर सुरू ठेवणाऱ्या खराडी येथील टेक्सास टॉवर- अमेरिकन ग्रील व बार, हॅकार्स किचन व बार, 7 अ रेस्टारंट व बार, स्पेस फॅक्टरी, 7 स्टड बार अँड लांज, मे. स्काय हाय 5 क्लब, हॉटेल टिक टॉक, हॉटेल क्वार्टर, वडगाव शेरी येथील मे. फूड म्युझिक लव्ह रेस्टॉरंट बार, व्टीन स्टार एलरो, युनिकॉर्न हाऊस, ए. एम. इंफ्रावैब यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
अनधिकृत बांधकामांचा अहवाल स्थायीसमोर
शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येते. या कारवाईदरम्यान प्रथम नोटीस बजावून पुढील प्रक्रिया पार पाडली जाते. अनधिकृत बांधकामांवर कारवाईसंदर्भात बांधकाम विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला काय कारवाई केली, याचा अहवाल स्थायी समितीसमोर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारवाईमध्ये कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत दिला आहे.