संयम आणि चिकाटीने नाते फुलते...

    14-May-2024
Total Views |
 
 

thoughts 
प्रत्येक माणसाला प्रेमाची गरज असते. तरुण वयात हाेणारे प्रेम ही जितकी आनंददायी, सुखकारक भावना आहे तितकीच जबाबदारीची देखील. दर पिढीनुसार ह्या प्रेमाकडे बघण्याची दृष्टी बदलत गेलेली आहे.ह्या प्रेमाची व्याख्या करणे कठीण आहे. प्रेम करणे आणि करवून घेणे ही नैसर्गिक गरज असते पण जेव्हा त्यात काही गफलती हाेऊ लागतात तेव्हा वेळीच सावध हाेणे आवश्यक आहे. प्रेमाचे देखील शास्त्र आहे.त्यावर सतत संशाेधन केले जाते.वयात आल्यावर स्त्रीपुरुषांनी एकत्र यावे, प्रजाेत्पादन करावे आणि वंशसातत्य टिकावे यासाठी निसर्ग नरमादीमध्ये आकर्षण निर्माण करताे. शरीरात त्या अनुषंगाने अनेक हार्माेन्स स्त्रवतात व त्यानुसार शरीरात बदल घडून येतात.
 
एकदा का त्यांचे शरीरातील कामे पूर्ण झाली की हार्माे न्सचा प्रभाव ओसरू लागताे. त्याचा परिणाम म्हणून आता आपल्यात काहीच प्रेम नाही असे काही जाेडपी म्हणतात. खरे तर त्यांचे निसर्गनियमानुसार आणि नेहमीच्या सहवासाने त्यांच्यातील आकर्षण कमी झालेले असते. तरुणाईवर प्रेमासंदर्भात सिनेमा, जाहिरातीत दिसणाऱ्या गाेष्टींचा जास्त प्रभाव असताे. त्यात दिसणाऱ्या स्वप्नाळू गाेष्टीवर ते विश्वास ठेवत असतात.सिनेमातील लव्ह स्टाेरीत जसे घडते आहे तसेच आपल्या बाबतीत व्हावे ह्यासाठी ते प्रयत्न करतात. ह्यातून मग आपल्याला दुसऱ्याबद्दल प्रेम वाटते आहे की ते आकर्षण आहे ह्यात फरक कळेनासा हाेताे. ह्यातून प्रेमभंग झाला तर नैराश्य येते.त्यामुळे प्रेमाविषयी विचार करतांना आपण कशाच्या तरी प्रभावाखाली येऊन तर प्रेम करत नाही ना ह्याचा विचार करणे आवश्यक आहे.
 
आजकाल ‘प्रेम’ हा ‘दाखवण्याचा’ विषय अधिक झाला आहे. काेणी काेणासाठी काय विकत आणले, किती महागडे गिफ्ट्स आणले, किती माेठी पार्टी दिली ह्याला महत्त्व आले आहे. सतत दुसऱ्या जाेडप्यांशी तुलना केली जाते. हे खरे तर प्रेम नव्हेच. आपल्या प्रेमाच्या माणसाला गिफ्ट देणे ह्यात काही गैर नाही परंतु प्रेम केवळ अशा भाैतिक गाेष्टींवर अवलंबून असू नये ह्याची जाणीव दाेघांना देखील असणे आवश्यक आहे. खरे प्रेम सावकाश बसते.विचारपूर्वक केले जाते. क्षमा करणारे आणि मनापासून क्षमा मागणारे असते. चर्चेने आणि समजुतीने वाट काढणारे असते. शरीरसंबंधापेक्षा सर्वांगीण नात्याची ओढ ह्यात अधिक असते. ह्यात कुठलीच लपवाछपवी केली जात नाही. संयम आणि चिकाटीने नाते फुलवले जाते.दाेघांचेही आयुष्य समृद्ध हाेण्यास खऱ्या प्रेमात वाव असताे.