एलआयसीचे पहिल्या हप्त्यापोटीचे उत्पन्न उच्चांकी 12383 कोटींवर

    14-May-2024
Total Views |

lic 
 
नवी दिल्ली, 13 मे (आ.प्र.) :
 
आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नात 113 टक्क्यांची वाढ नोंदवली असून, हे उत्पन्न मागील 12 वर्षांतील उच्चांकी म्हणजे 12383.64 कोटींवर गेल्याचे महामंडळाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी याच महिन्यात यापोटी 5810.10 कोटी रुपये एलआयसीने मिळवले होते. सर्वसामान्यांमध्ये विम्याविषयी जागरूकता आणि आस्था वाढल्याने विमा कंपन्यांच्या व्यवसायात महिनागणिक वाढ होत आहे. आयुर्विमा कंपन्यांना पॉलिसीच्या पहिल्या हप्त्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात सरलेल्या एप्रिलमध्ये 61 टक्क्यांची वाढ झाली आहे. वर्ष 2014 नंतर प्रथमच एलआयसीचे उत्पन्न उच्चांकी पातळीवर पोहोचले असून, कंपनीचे नावीन्यपूर्ण विपणन धोरण आणि त्याची अंमलबजावणी, विश्वासार्हता आणि ग्राहककेंद्रित सेवा अधिक मजबूत केल्याने ही कामगिरी साध्य केल्याचे एलआयसीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वैयक्तिक हप्ता श्रेणीअंतर्गत, एलआयसीने एप्रिलमध्ये एकूण 3175.47 कोटींचा हप्ता गोळा केला. एप्रिल 2023 मध्ये गोळा केलेल्या 2537.02 कोटींच्या तुलनेत तो 25.17 टक्केअधिक राहिला आहे. समूह हप्ता श्रेणीअंतर्गत एप्रिल 2023 मधील 3239.72 कोटींवरून एप्रिल 2024 मध्ये ते 182.16 टक्क्यांनी वाढून 9141.34 कोटी रुपये झाले. एलआयसीने विक्री केलेल्या पॉलिसी आणि योजनांची एकूण संख्या एप्रिल 2023 मध्ये 7.85 लाख होती. ती एप्रिल 2024 अखेर 9.12 टक्क्यांनी वाढून 8.56 लाखांवर पोहोचली आहे.