अक्षयतृतीयेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला आंब्यांचा नैवेद्य

    13-May-2024
Total Views |

puneet 
 
पुणे, 12 मे (आ.प्र.) :
 
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे अक्षयतृतियेनिमित्त आंबा मोहत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री गणेशाच्या मूर्तीला आंब्यांचा नैवद्य दाखविण्यात आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मंदिरात शुक्रवारी (10 मे) साजऱ्या करण्यात आलेल्या या महोत्सवानिमित्त कझाकस्तान (अस्ताना) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेला एमआयजीएस बॉक्सिंग क्लबचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश गोरखा आणि कोच उमेश जगदाळे यांच्या हस्ते ‌‘श्रीं'ची आरती करण्यात आली. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भूषण राख उपस्थित होते. डॉ. राख यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले, तर प्रसूतीचा संपूर्ण खर्च ते स्वतः करतात. त्यांचे हे सामाजिक कार्य आदर्श असून, इतरांसाठी दिशादर्शक आहे. त्यांचे कार्य असेच अक्षय्य राहो, अशी यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशाचरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह ट्रस्टी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
बाप्पाच्या माध्यमातून भाविक आणि समाजाची सेवा करण्याचे भाग्य
आंब्याच्या हंगामात बाप्पाला दाखवण्यात येणारा आंब्याचा नैवेद्य हा भाविकांसह सर्वांसाठी एक मोठा उत्सव असतो. हाच नैवेद्य येरवडा येथील बालग्राम, चिल्ड्रन व्हिलेज आणि महर्षीनगर येथील बाल शिक्षण मंच या सामाजिक संस्थांतील विद्यार्थांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. बाप्पाच्या माध्यमातून भाविकांची आणि समाजाची सेवा करण्याचे भाग्य मिळते आहे, याचा मनापासून आनंद वाटतो.
                                                                  -पुनीत बालन (उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)