प्रेक्षकही आम्हा कलाकारांचे गुरू : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ

दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या ‌‘गुरुमहात्म्य" पुरस्कारांचे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या उपस्थितीत वितरण

    13-May-2024
Total Views |
 
dag
 
पुणे, 12 मे (आ.प्र.) : ‌
 
‘नाट्य किंवा चित्रपट क्षेत्रात अगदी लहानांपासून मोठ्या प्रत्येकांकडून काहीतरी घेण्यासारखे असते. अजूनही मी विद्यार्थी आहे. मी करतोय हे लोकांना आवडत आहे. तरीही मी पूर्णत्वाला गेलो, असे म्हणू शकत नाही. यापुढेही मी बरेच काहीतरी करू शकतो, असे मला वाटते. राजदत्त यांच्याकडून आम्ही नकळत शिकून गेलो. प्रत्येक माणसात वेगळा गुण असतो. त्या न्यायाने प्रेक्षकही कलाकारांचे गुरू असतात,' असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. (कै.) श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुरुमहात्म्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे; तसेच दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार ॲड. रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उपप्रमुख सुनील रुकारी, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, ॲड. शिवराज कदम-जहागिरदार, राजू बलकवडे, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै आणि ज्येष्ठ उद्योजक डॉ. कैलास काटकर यांना यंदाचा गुरुमहात्म्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेत्री निवेदिता सराफ यावेळी उपस्थित होत्या.
 
श्री दत्तमहाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, महावस्त्र व 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राजदत्त म्हणाले, ‌‘प्रत्येकाच्या जीवनात दुःख असतात. मात्र त्याला तोंड देत त्यावर मात करत जीवन जगता आले पाहिजे. नैराश्य आणि दुःखाने माणूस अस्वस्थ होऊन जातो. तरीही आनंदात जगण्यासाठी माणसाला कष्ट करावे लागतात. आजच्या भोगवादी जीवनात चांगले विचार समाजात रुजवण्याचे दत्तमंदिर ट्रस्टचे कार्य सुरू आहे.' ‌‘कला, अध्यात्म व विज्ञान या क्षेत्रातील दिग्गज दत्त मंदिराच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. विज्ञानाने प्रगती केली असली, तरी मानवी जीवनाला दिशा देईल, असे वाटत नाही. विज्ञान हे तटस्थ आहे. मानवाने त्याचा उपयोग कसा करावा, यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे,' असे अभ्यंकर यांनी सांगितले. डॉ. शिकारपूर, प्रल्हाद पै, डॉ. काटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. ॲड. परदेशी यांनी स्वागत केले. गाडवे यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.