नवजात बाळासाठी पिताच विणताे पाळणा

    13-May-2024
Total Views |
 
 
 
Baby
 
नवजात बाळासाठी त्याच्या पित्यानेच पाळणा तयार करण्याची प्रथा आंध्र प्रदेशातील मुरिया आदिवासींमध्ये आहे.बांबूपासून ताे तयार केला जाताे.आंध्र प्रदेशाच्या अलुरी सीताराम राजू या जिल्ह्यातील चुक्कलापडू या पाड्यावर राहणाऱ्या काेव्वासी चुक्कय्या या मुरिया शेतकऱ्याकडे असे दाेन पाळणे आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांना पहिला मुलगा झाला तेव्हा त्यांनी पहिला पाळणा विणला आणि काही महिन्यांपूर्वी जन्मलेल्या दुसऱ्या मुलासाठी दुसरा. ‘हे पाळणे वजनाला हलके असल्याने काेठेही घेऊन जाता येतात आणि बाळ त्यात सुरक्षित राहते,’ असे काेव्वासी चुक्कय्या हे सांगतात. बाळासाठी पित्यानेच पाळणा विणण्याची अनिवार्य प्रथा मुरियांमध्ये असून, पिता-बाळ यांच्यासाठी ती आयुष्यभराची स्मृती असते.
 
अर्भकाच्या जन्मापूर्वी पिता जंगलात जाऊन बांबू ताेडून आणताे, ते वाळवताे आणि मग विणून पाळणा तयार करताे. हे काम त्याला काेणाचीही मदत न घेता करावयाचे असते हे विशेष.मुरियांच्या गाेंडी भाषेत या पाळण्याला ‘वुकाडा’ असे म्हणतात. ‘बाळ स्तनपानाच्या वयाचे असेपर्यंत त्याला या पाळण्यात ठेवले जाते. बाळ थाेडे समजदार झाल्यावर हा पाळणा तुझ्या पित्याने तुझ्यासाठी विणून तुला भेट दिल्याचे आम्ही सांगताे,’ अशी माहिती रव्वा मासम्मा या मातेने दिली.तिला दाेन मुले असून, त्यांचे पाळणे त्यांच्या पित्यानेच विणले आहेत. इच्छा असेपर्यंत मूल या पाळण्याचा वापर करू शकते. पाळण्याला दाेर बांधलेले असल्याने ताे झाडांच्या फांद्यांपासून घरापर्यंत काेठेही टांगता येताे.