अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

गणपती मंदिरात ‌‘शारदेश मंगलम्‌‍" विवाहसोहळा उत्साहात संपन्न; पहाटेपासून भाविकांच्या रांगा

    12-May-2024
Total Views |

man 
 
पुणे, 11 मे (आ.प्र.) :
 
मंगलमूर्तीच्या भोवती केलेली आंब्यांची आरास... सनई व मंगलाष्टकांचे मंगल स्वर आणि लग्नसोहळ्यासाठी सजलेला मंडप, अशा वातावरणात अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यासोबतच श्री गणेश आणि देवी शारदा यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन व्हावे, यासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजिण्यात आला होता. त्यात गणपती बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.
 
पुण्यातील आंब्यांचे प्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई यांच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, अथर्व केदारी, पिनाक भट, बापू किकले, रवी पठारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गाणपत्य सांप्रदायातील परंपरेनुसार विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा हे तिसरे वर्ष आहे. दुपारी 12 वाजून 41 मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम्‌‍ सोहळा थाटात पार पडला. सभामंडपात लग्नसोहळ्यातील सर्व धार्मिक विधींसह मंगलाष्टके झाली. मंदिरात शुक्रवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे 4 वाजता प्रख्यात गायिका मनीषा निश्चल यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी 8 वाजता विशेष गणेशयाग झाला. रात्री अखिल भारतीय महिला वारकरी मंडळाच्या वतीने उटीचे भजन सादर करण्यात आले. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांनी लग्नसोहळ्याचे पौरोहित्य केले. तसेच, आंब्यांचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात आला.