उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवावे

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांचे निर्देश; निवडणूक निरीक्षकांकडून जिल्ह्यातील तयारीचा आढावा

    30-Apr-2024
Total Views |

ex 
 
पुणे, 29 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा निवडणूक खर्च योग्य पद्धतीने नोंदविला जाईल, यावर लक्ष ठेवून निवडणूक खर्चाची पडताळणी करावी. नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी दिले. पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि खर्च निरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांसह निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
 
मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदीती राजशेखर, पोलीस निरीक्षक विवेकानंद सिंग, खर्च निरीक्षक सुधांशू राय, पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, पोलीस निरीक्षक ज्योती नारायण, खर्च निरीक्षक कमलेश मकवाना, बारामती पोलीस निरीक्षक जॉएस लालरेम्मावी, खर्च निरीक्षक विजय कुमार, शिरूरचे निरीक्षक कुमार सौरभ राज, पोलीस निरीक्षक जया गौरी, खर्च निरीक्षक बी. मोहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे उपस्थित होते. निवडणुकीत रोकड, मद्य; तसेच अन्य कोणत्याही आमिषांचा वापर होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर; तसेच भरारी पथकांद्वारे जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री प्रकरणांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्तीसह कठोर कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या आहेत.
 
जिल्ह्यात 8 हजार 382 मतदान केंद्रे असून, 19 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्र एकही नसून शॅडो भागातील 38 मतदान केंद्रे आहेत. येथे संपर्कासाठी हॅमरेडिओसह अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदारसंघांसाठी मिळून 10 हजार 31 क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी; तसेच 859 सेक्टर पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. टपाल, ई-मेल आदींद्वारे तसेच सी-व्हिजिलद्वारे आचारसंहितेच्या 782 तक्रारी प्राप्त झाल्या असून, कारवाई करण्यात आल्याचे डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.