बिबवेवाडीत ESIC हॉस्पिटल सुरू हाेणार : मोहोळ

    29-Apr-2024
Total Views |

mo 
 
पुणे, 28 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
बिबवेवाडीमध्ये ईएसआयसी म्हणजे कर्मचारी विमा निगमचे 100 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. आता 7 मजली बिल्डिंग मध्ये सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज 500 बेडच्या विस्तारित हॉस्पिटलचे काम सुरू केले गेले आहे. 16 एकर जमिनीवर याचे काम लवकरच पूर्ण होईल आणि हॉस्पिटल लवकरच सुरू होईल. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‌‘या हॉस्पिटलमुळे पर्वती, बिबवेवाडी, सिंहगड रोड, भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळतील.' पर्वती विधानसभा मतदारसंघातील आंबेडकर नगर, आदिनाथ सोसायटी, प्रेमनगर, गंगाधाम, मार्केटयार्ड बस डेपो, महेश सोसायटी, चिंतामणी नगर, अपर इंदिरानगर इत्यादी ठिकाणी काढण्यात आलेल्या प्रचार यात्रेच्या दरम्यान मोहोळ बोलत होते.
 
याप्रसंगी शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, श्रीनाथ भिमाले, दीपक मिसाळ, राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, रूपाली धाडवे, वर्षा साठे, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबेले, अनसूया चव्हाण, प्रशांत दिवेकर, शिवसेना नेते सुधीर कुरुमकर, नितीन लगस, श्रीकांत पुजारी, अविनाश खेडेकर, एनसीपीचे संतोष नांगरे, श्वेता होनराव इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. मोहोळ म्हणाले की, काँग्रस अनेक वर्षांपासून ससूनप्रमाणे हॉस्पिटल बांधण्याची घोषणा करत आहे. पण त्यांचे आश्वासन पूर्ण झाले नाही. आमदार माधुरी मिसाळ यांनी सातत्याने केलेल्या फॉलोअपमुळे केंद्र सरकार या हॉस्पिटलची निर्मिती करीत आहे. नवीन विशाल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग (आयसीयू), ओपीडी, सुपर स्पेशालिटी सुविधांसाठी वेगळे वॉर्ड, जनरल आणि अतिदक्षता विभागाचे वॉर्ड असतील. त्यामध्ये रेडिओलॉजी, बायोके मिस्ट्री,मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळासुद्धा असतील. पुढील दोन वर्षांमध्ये या हॉस्पिटलची निर्मिती पूर्ण होईल.
 
मनपाचे मेडिकल कॉलेज सुरू
मोहोळ म्हणाले की, माझ्यासाठी ही विशेष आनंदाची गोष्ट आहे की, पुणे मनपाचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज माझ्या महापौरपदाच्या कार्यकाळात सुरू होऊ शकले. हे कॉलेज मेडिकल विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण आणि पेशंट्सना स्वस्त आरोग्य सेवा देते. कोरोना काळात शहरातील आरोग्य व्यवस्थांचे आधुनिकीकरण आणि विस्तार केला गेला.