शक्तिप्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

    27-Apr-2024
Total Views |
 
mo
 
पुणे, 26 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
भाजप-महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्त कर्वे रस्त्यावर काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेमध्ये महायुतीच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी जेसीबीच्या साह्याने फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत नागरिकांनी मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अेशारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोहोळ यांच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यासह शहरातील महायुतीचे सर्व आमदार आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते.
 
सुमारे चार तास पदयात्रा सुरू होती. महर्षी धोंडो केशव कर्वे पुतळा, मृत्युंजयेश्वर मंदिर, दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉप मेट्रो स्टेशन, गरवारे महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर स्मारकमार्गे खंडुजीबाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला. प्रचारसभा सुरू असताना महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले. चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसे नेते बाबू वागस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे, मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे शहर अध्यक्ष संजय सोनावणे या वेळी उपस्थित होते. त्यादरम्यान खंडुजीबाबा चौकातील जाहीर सभेत मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची भाषणे झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून प्रचारसभेचा समारोप झाला.