सुनेत्रा पवार यांच्या दौंड तालुक्यातील प्रचारात रंगत

    26-Apr-2024
Total Views |

su 
 
दौंड, 25 एप्रिल (आ.प्र.) :
 
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. दौंड तालुक्यातील खडकी येथून सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वैशाली नागवडे, उत्तमराव आटोळे, नंदू पवार, वीरधवल जगदाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रथमच दौंड तालुक्यात संयुक्त दौरा होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्वच प्रमुख एकवटले आहेत. आम्ही प्रमुखच आता एकत्रपणाने या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे दौंड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल, असा विश्वास माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केला.
 
तर महायुतीत आम्ही सर्वांनी एकत्रित पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सुनेत्रा पवार यांना अधिकाधिक मतदान होईल यासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन आमदार राहुल कुल यांनी यावेळी केलं. देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. विकासाला महत्त्व देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी यावेळी केलं. महायुतीची वज्रमूठ दिवसेंदिवस घट्ट होत असताना आपणही त्यात सामील होऊन विकासरथात सहभागी होऊन घड्याळाला अधिकाधिक मतदान करावं, असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचं दौंड तालुक्यातील विविध गावांत उत्साहात स्वागत होत आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार दौंड तालुका दौऱ्यावर असताना हातवळण गावात गेल्या असता तेथील स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील, असा विश्वास दिला. तसेच, महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.