बापाचा आशीर्वाद

22 Apr 2024 23:49:34
 
 

thoughts 
 
प्रत्येक वाहनाला त्याच्या मालकाचा स्वभाव लाभलेला असताे.कारचे मालक हे सुखवस्तू असतात किंवा सुखवस्तू बनलेले असतात, ते अगदीच एखादा बुवाबापू किंवा राजकीय नेता यांचा फाेटाे वगळता गाडीच्या मागे काही लावत नाहीत.काही लाेक मागच्या काचेवर मुलांची, नातवंडांची नावं लिहितात.पण तेवढंच. मालमाेटारींचे मालक हे कष्ट करून माेठे झालेले असतात.त्यांना आपल्या कर्तबगारीचा गर्व असताे, ताे रांगड्या शब्दांत व्यक्त हाेत असताे. ते सतत रस्त्यावरच्या इतर ट्रकचालकांना ललकारत असतात, छाेट्या गाड्यांना धमकावत असतात मागच्या भागावर काही बाही लिहून.
 
रिक्षावाला हा मालक असाे की चालक असाे, तसा छाेटा माणूस असताे. पै पै जाेडून रिक्षा घेतलेली असते. तिच्या आधारावर घर असतं, गावाकडे पैसे पाठवत असताे, इकडे साध्या घरात साधेपणाने राहून सगळ्या कुटुंबाचा भार ओढत असताे. त्यामुळे रिक्षाच्या मागे कृतज्ञतेच्या किंवा तत्सम भावना असतात. आईचा आशीर्वाद ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची भावना. या रिक्षावाल्याने मात्र बापाचे आशीर्वाद मानले आहेत, हे वैशिष्ट्य. ते त्याने रिक्षाच्या मागे असलेल्या छाेट्या विंडाेवर लिहिलेत शब्द. पण मागून प्रकाश आला, की त्या शब्दांची सावली त्याच्या पाठीवर पडते आहे. जणू वडिलांचा आशीर्वादच सदैव त्याच्या पाठीशी आहे. किती हृद्य आहे हे!
 
Powered By Sangraha 9.0