सरासरीपेक्षा अधिक मतदानासाठी प्रयत्न करा

    19-Apr-2024
Total Views |
 
 

votinng 
 
अनेक बाबींत अग्रेसर असणाऱ्या काेल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले मतदान झाले आहे. यावेळच्या लाेकसभा निवडणुकीतही देश आणि राज्यातील मतदानाच्या सरासरी टक्केवारीपेक्षा अधिक टक्क्यांनी मतदान हाेण्यासाठी प्रयत्न करा.यासाठी मतदार जनजागृतीवर भर द्या, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चाेक्कलिंगम यांनी दिल्या.लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाेक्कलिंगम यांनी काेल्हापूर जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात सर्व नाेडल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमाेल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, जिल्हा पाेलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, अपर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले लाेकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे आदी उपस्थित हाेते.
 
यावेळी लाेकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 काेल्हापूर व हातकणंगले लाेकसभा मतदारसंघाच्या संपर्क पुस्तिकेचे (कम्युनिकेशन प्लॅन) अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी चाेक्कलिंगम यांनी दाेन्ही मतदारसंघांच्या मतमाेजणीचे ठिकाण, स्ट्राँग रूमची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.जिल्हाधिकारी येडगे यांनी सादरीकरणातून निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. यापूर्वी कमी मतदान झालेल्या भागातील, तसेच डाेंगराळ भागातही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मीडिया कक्ष, एमसीएमसी समिती, एक खिडकी याेजना, नियंत्रण कक्ष, खर्च नियंत्रण कक्ष आदी विविध कक्ष स्थापन करण्यात आले असून, या कक्षांमार्फत कामकाज करण्यात येत आहे, असे येडगे यांनी सांगितले.आचारसंहितेचे पालन हाेण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययाेजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सादरीकरणातून दिली.