कंटेंट क्रिएटर्सनी देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे

    18-Apr-2024
Total Views |

c 
 
पुणे, 17 एप्रिल (आ.प्र.) :
 
मतदाराच्या एका मतामध्ये सरकार बदलण्याची किंवा स्थापन करण्याची ताकद असते. अधिकाधिक मतदारांनी या ताकदीचा वापर करावा, यासाठी कंटेट क्रिएटर्सनी मतदानाबाबत जागृती करून देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे, असे आवाहन ‌‘पुनीत बालन ग्रुप'चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केले. मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‌‘पुनीत बालन ग्रुप' तर्फे पुण्यात ‌‘वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रिएटर्स मीट'चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बालन बोलत होते. यावेळी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांच्यासह मोठ्या संख्येने कंटेट क्रिएटर उपस्थित होते. पुनीत बालन म्हणाले की, सध्या सोशल मीडियाची ताकद प्रचंड असून, तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिक सोशल मीडियाचा एक भाग बनले आहेत. या ताकदीचा वापर देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोशल मीडियातील कंटेट क्रिएटर्सनी सक्रिय योगदान देण्याची गरज आहे. मुरलीधर मोहोळ यांनी मतदानाबद्दल जागृती करण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, ‌‘सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांशी संवाद होतो. त्यांचे प्रश्न जाणून घेता येतात आणि त्यावर उपाययोजनाही करता येतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून अधिक प्रभावी काम करता येते.'
 
पुनीत बालन म्हणाले, ‌‘सोशल मीडियाच्या माध्यमातून कंटेट क्रिएटर्सनी लोकांमध्ये सकारात्मकता पसरवणे गरजेचे आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे लोकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती केली, तर मतदानाचे प्रमाण वाढेल आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना देशाच्या विकासाचे भागीदारही बनता येईल. मतदारांनीही मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे, म्हणून घरी न बसता जागरूक नागरिक म्हणून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. तरच त्यांना सरकारवर बोलण्याचा अधिकार उरेल.'
 
राष्ट्रीय कार्य होईल, यात काही शंका नाही ‌‘चित्रपट पोहोचवण्यासाठी क्रिएटर्स यांची भूमिका सध्या अत्यंत महत्त्वाची आहे. काही सेकंदांच्या कंटेंटमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम अवघड असते. परंतु, कंटेट क्रिएटर्स आपल्या प्रतिभेतून आणि निरीक्षण शक्तीद्वारे हे काम सहज करू शकतात. असेच काम त्यांनी मतदानाबाबत जागृती करण्यासाठी केले, तर ते राष्ट्रीय कार्य होईल, यात काही शंका नाही.'
                                                                                                                              -प्रवीण तरडे, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते