राज्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सदिच्छादूत

पुण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मतदारांची जनजागृती करणार

    18-Apr-2024
Total Views |
 
n
 
पुणे, 17 एप्रिल (आ.प्र.) :
 
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रथमच राज्यात मतदार जागृतीसाठी कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. राज्यस्तरावर 16 सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्त्व समजून सांगणार आहेत. पुण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सदिच्छादूतचे काम करणार आहेत. राज्यस्तरीय सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, अभिनेत्री सान्वी जेठवानी, महिला क्रिकेटपटू स्मृती मनधना, सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, तृतीयपंथी प्रणीत हाटे, तृतीयपंथी झैनाब पटेल, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत, दिव्यांग कार्यकर्ती सोनल नवनगुल यांचा समावेश आहे.
 
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर असतात जे समाजाला प्रेरित करतात. हेच मान्यवर आता सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. पुण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, आर.जे. संग्राम खोपडे हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करतील. अहमदनगर जिल्ह्यसाठी पद्मश्री राहीबाई पोपरे सदिच्छादूत असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदानाच्या हक्काचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचच एक भाग म्हणून मतदार जागृतीच्या सदिच्छादूत या उपक्रमांना राज्यात चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. सोशल मीडिया, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत.