अल्पवयीन वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या रडारवर

16 Apr 2024 14:02:07

mi 
 
पिंपरी, 15 एप्रिल (आ.प्र.) :
 
अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहने दिल्याने अपघाताचा धोका वाढतो. परिणामी मुलांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतो. मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तसेच अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अल्पवयीन वाहनचालक आणि त्यांना वाहन चालवण्यासाठी देणारे वाहनमालक यांच्यावर 6 ते 12 एप्रिल या कालावधीत 571 कारवाया करण्यात आल्या आहेत, तर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 677 जणांवर कारवाया केल्या आहेत. 16 वर्षांखालील मुलांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील त्यांना वाहन चालवण्यास देणे आता पालकांना आणि वाहनमालकांना महागात पडणार आहे.
 
वाहतूक पोलिसांकडून अशांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अल्पवयीन वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या रडारवर आले आहेत. 6 ते 12 एप्रिल या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमेत 571 जणांवर कारवाई करून त्यांच्यावर 41 लाख 40 हजार एवढा दंड आकारण्यात आला आहे. तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे देखील अपघातांची शक्यता वाढते. त्याबाबत देखील वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष मोहिमेत एका आठवड्यात वाहतूक पोलिसांनी 677 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवल्या प्रकरणी निगडी वाहतूक विभागात सर्वाधिक 124 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून त्यांच्यावर होणारी दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई टाळावी, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0