देवेंद्र फडणवीस राज्याच्या इतिहासातील सर्वांत अपयशी गृहमंत्री

16 Apr 2024 14:11:32
 
sule
 
पुणे, 15 एप्रिल (आ.प्र.) :
 
अभिनेता सलमान खान याच्या घरासमोर गोळीबार झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक अपयशी गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. सलमान खानच्या घरासमोर गोळीबार धक्कादायक आहे. भर रस्त्यावर असं होत असेल, तर हे राज्य सरकारचे आणि गृह विभागाचे अपयश आहे. मुंबईसारख्या ठिकाणी भर रस्त्यावर अशा प्रकारे गोळीबार होत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. ‌‘अबकी बार, गोळीबार सरकार' या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
 
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, राज्यात गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुण्यातदेखील कोयता गँगची दहशत सुरूच आहे. कोयता गँगला पुन्हा डोकं वर काढू देणार नाही, असं सांगितलं जातं. तरीही कोयता गँगची दहशत पुणे परिसरात कायम आहे. महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या भारताच्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं अशा या महामानवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधानाचे रक्षण आमच्याकडून नेहमी केलं जाणार आहे.
 
भाजपचे खासदार आम्हाला संविधान बदलायचं आहे, असं बोलले होते. एक प्रकारे त्यांच्या पोटातलं ओठावर आलं असून, या सरकारला संविधान बदलायचं आहे, त्यासाठी त्यांनी 400 पारची घोषणा दिली आहे. शरद पवार यांच्यावर टीका 60 वर्षे सुरू आहे आणि त्यांच्यावर टीका केली की हेडलाइन होते हे सर्वांना माहीत आहे. दररोज शरद पवार यांच्या विरोधात कटकारस्थान सुरू आहे. आपलं नाणं गेलं 60 वर्षे मार्केटमध्ये खणखणीत आहे. ही चांगली बाब आहे. त्यांना काहीही करून शरद पवार यांना संपवायचं आहे आणि हे त्यांचं कटकारस्थान आहे, अशी टीका भाजपावर सुळे यांनी केली.
Powered By Sangraha 9.0