रामटेकडी येथील बायो एनर्जी प्रकल्पात 5 वर्षांत वीजनिर्मिती नाही

प्रकल्पाच्या आवारात हजारो टन कचरा साठून आरोग्यासाठी घातक ‌‘कचरा डेपो" तयार

    15-Apr-2024
Total Views |

raam 
 
पुणे, 14 एप्रिल, (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
रामटेकडी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा 750 टन क्षमतेचा प्रकल्प सुरू होऊनही अद्याप वीजनिर्मिती होऊ शकलेली नाही. याठिकाणी सध्या कचऱ्यापासून बॉयलरसाठी लागणारे इंधन तयार केले जात असून, तेदेखील पूर्ण क्षमतेने केले जात नसल्याने प्रकल्पाच्या आवारात हजारो टन कचरा साठून आरोग्यासाठी घातक ‌‘कचरा डेपो' तयार झाला आहे. अनेक वर्षे अशीच परिस्थिती असताना मात्र किरकोळ कारवाईच्या पलीकडे महापालिका प्रशासन कुठलेच डेअरिंग करत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रामटेकडी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पासाठी 2012-13 पासून हालचाली सुरू आहेत. सुरवातीला देवाची उरुळी कचरा डेपोमध्ये 500 आणि 250 मेट्रिक टन क्षमतेचे दोन स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात येणार होते.
 
परंतु, नंतर स्थानिक गावकऱ्यांचे कचरा डेपोविरोधातील आंदोलन तीव्र झाल्याने रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील जागेत एकच 750 टन क्षमतेचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प ज्या कंपनीच्या कल्पनेनुसार पुढे आला त्या कंपनीने एवढा मोठा प्रकल्प डिबूट तत्त्वावर करण्यास असमर्थता दर्शवली. यानंतर पुणे बायो एनर्जी ही कंपनी पुढे आली. 2019 मध्ये स्थायी समिती आणि सर्वसधारण सभेमध्ये एकाच दिवशी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. विशेष असे की, महापालिकेने रुरकी आयआयटीकडून प्रकल्प अहवाल तयार करून घेतला. 2016 मधील पर्यावरण कायद्यातील कचरा प्रक्रियेच्या नियमातील बदलानुसार प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसोबत बॉयलरसाठीचे इंधन उत्पादित करण्याचे सुचविण्यात आले. त्यानुसार प्रकल्पामध्ये बदल करण्यात आला. यामुळे प्रकल्पाचा खर्च सुमारे 90 कोटी रुपयांनी वाढलाच, परंतु टिपिंग फीदेखील दोनशे रुपयांनी वाढली.
 
2019 मध्ये प्रस्तावाला मान्यता देताना संबंधित कंपनीने पहिल्या वर्षभरात बॉयलरसाठीचे इंधन निर्मिती करावी. तसेच, राज्य वीज नियामक आयोग व संबंधित कर्ज उपलब्धतेची प्रक्रिया पूर्ण करून एक वर्षाने प्रत्यक्ष वीज निर्मितीस सुरुवात करावी लागेल, अशी अट घालण्यात आली. यानुसार पहिल्या वर्षी या कंपनीने 300 टन कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. तसेच कर्ज व वीज नियामक आयोगाकडेही पाठपुरावा सुरू केला. दरम्यान, 2020 आणि 2021 मध्ये कोरोनाच्या साथीमुळे सर्वच व्यवहार ठप्प राहिले. त्याचवेळी प्रकल्प सुरू ठेवण्यातील अडचणीमुळे या प्रकल्पात क्षमतेपेक्षा कमी कचऱ्यावर प्रक्रिया होत राहिली. त्यामुळे प्रकल्पाच्या आवारात कचऱ्याचे ढीग साठू लागले.
 
वीज नियामक आयोगाने 2022 मध्ये संबंधित प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली, तर यावर्षी जानेवारीमध्ये अंतिम मान्यता दिली आहे. या कालावधीत संबंधित कंपनीला 33 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. तर, आणखी 11 कोटी रुपये देण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या आवारात सध्या 15 हजार टनांहून अधिक कचरा सध्या पडून आहे. या कचऱ्याला उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. तर, पावसाळ्यात कचरा ओला होऊन लिचेट तयार होत आहे. यामुळे परिसरात पुन्हा आरोग्याच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. हा कचरा उचलला, अथवा त्यावर प्रक्रिया केली जात नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू करता येणार नाही, असे अधिकारी सांगतात.
 
पुणे बायो एनर्जीच्या माध्यमातून रामटेकडी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. कोरोना आणि तांत्रिक परवानग्या व अडचणींमुळे प्रकल्पाला विलंब झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या आवारात कचरा साठला आहे. क्षमतेपेक्षा कमी कचऱ्यावर प्रक्रिया केल्याप्रकरणी संबंधित कंपनीला आतापर्यंत 34 वेळा नोटिसा देण्यात आल्या आहेत, तसेच 19 लाख रुपये दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. डिसेंबर 2025 पर्यंत प्रकल्पात प्रत्यक्षात वीजनिर्मिती सुरू करण्याबाबत संबंधित कंपनीला आदेश देण्यात आले आहेत.
                                                                        - कमलेश शेवते (अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका.)