मोदींची वक्रदृष्टी पडली, तर फेसबुक लाइव्ह करणाऱ्यांना फेस येईल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीच्या पुण्यातील मेळाव्यात टीका

    13-Apr-2024
Total Views |

modi 
 
पुणे, 12 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
कोरोनाच्या लाटेत आपण सर्वच काम करीत होतो; परंतु काहीजण घरात बसून फेसबुक लाइव्ह करीत होते. ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करीत आहेत. आपण काय बोलतो आहे, कोणावर बोलतो आहे, याचा विचार केला पाहिजे. मोदींची वक्रदृष्टी पडली, तर फेसबुक लाइव्ह करणाऱ्यांना फेस येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. महायुतीचे पुणे शहरातील उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
 
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे ( शिंदे गट) शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यासह आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाआधी अजित पवार यांचे भाषण झाले. त्यांनी महायुतीच्या वक्त्यांनी प्रचारादरम्यान अपशब्द जाणार नाही, यांचे भान ठेवावे, असे सांगितले होते. एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत दररोज आरोप-प्रत्यारोप होणार.
 
परंतु आपल्यावर झालेल्या आरोपांना आपण विकासकामाने उत्तर देणार आहे, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना एका प्राण्याचे नाव देत खिल्ली उडविली; तसेच काँग्रेसचा रावण म्हणून उल्लेख करीत या निवडणुकीत त्यांचा अंत करण्याचा आवाहनही शिंदे यांनी केले. गेल्या पावणे दोन वर्षात राज्य सरकारने खूप काम केले. मतदारांपुढे जाताना तुम्हाला खाली मान घालण्याची गरज नाही, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे काम करणारे सरकार आहे. सर्वसामान्यांचे सरकार आहे. उद्योगधंदे महाराष्ट्रात आणणारे सरकार आहे. महायुतीच्या आधीच्या सरकारच्या (महाविकास आघाडी) सर्व कामकाज ठप्प झाले होते. कोविडमध्ये आपण सर्व काम करीत होतो. लोकांचे जीव वाचत होतो; परंतु काही लोक खिचडी, ऑक्सिजन प्लाँटमध्ये भ्रष्टाचार करीत होते. राज्यकर्त्यांने कधी अहंकार ठेवायचा नसतो. अहंकारामुळे रावण जळून खाक झाला. काँग्रेसरुपी रावणाचा अंत या निवडणुकीच्या निमित्ताने करावयाचा आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. कोणतीही आपला पराभव करू शकत नाही; परंतु ते गाफील राहिले, तर उमेदवाराचा पराभव हा महायुतीचे कार्यकर्ते करू शकतात. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.