ले-ऑफ, बदलत्या तंत्रज्ञानाने नाेकरदार चिंतेत

    13-Apr-2024
Total Views |
 

Office
जीवन म्हटल्यावर तणाव हा त्याचा अपरिहार्य भाग आहे. ताे पूर्वीही हाेता, आजही आहे आणि उद्याही असेल. तणाव पूर्णपणे टाळणे श्नय नसले, तरी त्याचे प्रमाण कमी करता येते. मात्र, सध्याच्या स्पर्धेच्या युगात सतत स्वत:ला सिद्ध करण्याच्या अपरिहार्यतेमुळे तणाव वाढला आहे.त्यात भर पडली आहे ती ले-ऑफ आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची. नाेकरी कधीही जाईल याची भीती बहुसंख्य नाेकरदारांना वाटते आणि नवीन तंत्रज्ञानाबराेबर जुळवून घेण्याची कसरतही टाळता येत नाही.नयना भदाेरिया ही महिला अशा तणावाला प्रदीर्घ काळ सामाेरी जाते आहे. आपण तणाव नियंत्रणात ठेवू शकत नसल्याचे त्यांना वाटते.एखादी माेठी जबाबदारी आल्यावर त्यांना खचल्यासारखे हाेते. ‘एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी माझी निवड झाल्यावर मला उत्तेजित झाल्यासारखे वाटते, पण ते काम सर्वाेत्तम करण्याच्या दबावामुळे ताण येऊन मी आजारी पडते,’ असे त्या म्हणतात.
39 वर्षांची ही महिला दिल्लीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कम्युनिकेशन विभागात काम करते. ‘काम करत असले, तरी माझ्या मनातील भीती संपत नाही,’ असे त्या सांगतात. तणाव असह्य झाल्यावर त्यांनी एका समुपदेशकाची मदत घेतली. आपल्या अतिमहत्त्वाकांक्षांना कशा मर्यादा ठेवाव्यात याबाबत त्यांना सल्ला दिला गेला. नयना यांचा तणाव थाेडा कमी झाला असला, तरी अजून काही सेशन्स त्यांना घ्यावी लागणार आहेत.वाढते ले-ऑफ आणि तंत्रज्ञानातील वेगवान बदलांबराेबरच हायब्रिड वर्क कल्चरच्या आव्हानांना नाेकरदारांना सामाेरे जावे लागत आहे. आपल्या करिअरमध्ये यशस्वी असलेले आणि कामाबाबत समाधानी असलेल्यांनाही झाेपेविनाच्या रात्रींना सामाेरे जावे लागते आहे.‘अतिमहत्त्वाकांक्षी लाेकांना कायम आपले काही तरी चुकल्यासारखे वाटते आणि त्यातून त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण हाेते,’ असे आर. राहुल या मानसाेपचारतज्ज्ञाने नमूद केले.
‘अतिअचूकतेच्या ध्यासामुळे असे लाेक सतत दबावाखाली राहतात आणि त्यांच्या कामात किरकाेळ चूक राहिली, तरी ते अस्वस्थ हाेतात. काम म्हणजे बक्षिसे आणि आर्थिक फायदे असा विचार हे लाेक करत असल्याने त्यांचा तणाव वाढताे,’ असे राहुल पुढे सांगतात.काेणत्याही कामामध्ये काही वेळा अपयश येऊ शकते आणि त्यात विशेष काही नाही.पण अतिअचूकतेचा ध्यास असलेल्या लाेकांना अपयशाचीसुद्धा भीती वाटते. आपल्याला एखादे काम न जमणे म्हणजे कमीपणा असल्याचे त्यांना वाटते.त्यातून तणाव वाढतात. साेबतच, सतत काम करणे, जादाचे काम करणे आदींमुळेही तणावांत वाढ हाेत असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले. ‘असुरक्षिततेची भावना सर्व वयाेगटांतील प्राेफेशनल्समध्ये आढळते,’ अशी माहिती मुंबईतील के. जे. साेमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील सहायक प्राध्यापिका विद्या ठकार यांनी दिली. ‘सुपर वूमन’च्या भावनेतून अनेक महिला अतिअचूकतेच्या आग्रहापायी तणावांना सामाेऱ्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सतत नव्या आव्हानांना सामाेरे जाणारा कर्मचारी हे काेणत्याही नियाे्नत्याचे स्वप्न असते.मात्र, सतत असे हाेत राहिले, तर कर्मचाऱ्याची उत्पादकक्षमता घटते. त्यामुळे किती आव्हानांना सामाेरे जावे याचा निर्णय संबंधितांनी करायला हवा. एखाद्या संस्थेत कर्मचाऱ्यांची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा नसेल, त्यांना बक्षिसे दिली जात नसतील, तर तेथील लाेकांमध्ये चिंतेची भावना जास्त असते. सध्याच्या काळात ले-ऑफमुळेही चिंता वाढल्याचे दिसते.सध्याच्या काळात नाेकरी टिकण्याची खात्री नाही आणि कामाचे तास वाढत असल्यामुळेही तणावनिर्माण हाेत आहेत. त्यातच ठरावीक वेळेत काम पूर्ण करण्याचा दबाव येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याचे आढळले आहे. नियाेक्ते आणि कर्मचारी यांनी याकडे गांभीर्याने पाहायला हवे, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
तणावाखाली असलेल्या कर्मचाऱ्यांना सल्ला देऊन मदत करणे, त्यांची काैशल्ये वाढविण्यासाठी प्रशिक्षणासारखे कार्यक्रम आयाेजित करणे यांचाही उपयाेग हाेताे. आपल्या हाताखालील कर्मचारी थकले आहेत का, यावर व्यवस्थापकांची नजर असणेही आवश्यक ठरते. अशा कर्मचाऱ्यांना मदत करून सावरण्याची गरज असते. अतिथकव्याचा (बर्नआउट) परिणाम कार्यक्षमतेवर हाेत असल्याने त्याच्या लक्षणांकडे बारकाईने पाहण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असुरक्षिततेची भावना असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काम म्हणजेच आयुष्य असते. मात्र, फक्त काम म्हणजे आयुष्य नसल्याचे त्यांना पटवून दिले पाहिजे. आपल्याला असुरक्षित का वाटते याची लक्षणे प्रथम जाणून घ्या आणि मग उपाय शाेधा, असा आर. राहुल यांचा सल्ला आहे. ते म्हणाले, ‘वास्तववादी लक्ष्ये ठेवा आणि त्यांचे लहान भागांत विभाजन करून ती पूर्ण करा. स्वत:बाबत सहानुभूतीसुद्धा ठेवायला हवी.आपल्या कुटुंबीयांसाठी वेळ ठेवा, मित्रांबराेबर राहा. आवडीच्या छंदांमुळे तणाव कमी हाेत असल्याने एखादा छंद अवश्य जाेपासा.