माेकाट शहामृगाने उडविली वाहनचालकांची तारांबळ

    31-Mar-2024
Total Views |
 
 


road
 
 
 
दक्षिण काेरियातील सेओंगनम या शहरात रस्त्यावर अचानक आलेल्या एका ‘पाहुण्या’मुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली हाेती. पाेलीस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून त्याची त्याच्या मूळ जागी सुखरूप रवानगी केल्यावर गाेंधळ थांबला. हा शहामृग स्थनिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता रस्त्यावर आला आणि 10.25 वाजता त्याला पकडण्यात आले.हा ‘पाहुणा’ म्हणजे एक शहामृग हाेता आणि सेओंगनममधील एका प्राणिसंग्रहालयातून त्याने पळ काढला हाेता. माेकाट सुटलेला हा शहामृग शहरातील डाएवून टनेल या गर्दीच्या रस्त्यावर आल्यावर गाेंधळला आणि माेटारींच्या बाजूने पळायला लागला.
 
एवढा माेठा पक्षी रस्त्यावर आलेला पाहून वाहनचालकांची तारांबळ उडाली आणि त्याला धडक बसू नये, म्हणून गाड्या कमी गतीने धावायला लागल्या. परिणामी, वाहतुकीची काेंडी झाली. ‘ताडाेरी’ असे या शहामृगाचे नाव असून, वाहनांच्या गर्दीतून धावताना ताे एका ट्रकवर आदळलाही हाेता. सुमारे एक तास ताे रस्त्यावरून धावपळ करत हाेता.काही वाहनचालकांनी काढलेले या घटनेचे व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाले असून, नेटकऱ्यांनी त्यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हा शहामृग एखाद्या माेटारीच्या वेगाने धावत हाेता,’ असे एकाने म्हटले आहे, तर ‘धावताना ताे काय विचार करत असेल?’ असा प्रश्न दुसऱ्याने केला आहे.