ऐन उन्हाळ्यात पिंपरी पालिकेचे पाच जलतरण तलाव बंदच

    28-Mar-2024
Total Views |

sw 
 
पिंपरी, 27 मार्च (आ.प्र.) :
 
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील नागरिकांची पावले पोहायला जाण्यासाठी जलतरण तलावाकडे वळत आहेत, मात्र महापालिकेचे शहराच्या विविध भागांतील 13 जलतरण तलावांपैकी आठच तलाव सुरू आहेत, तर पाच तलाव अद्यापही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळे गुरव, नेहरूनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत 13 जलतरण तलावांची उभारणी केली आहे. मार्च महिना सुरू झाला असताना वातावरणातील तापमानही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, पोहण्यासाठी जलतरण तलावांवर गर्दी होत आहे. पालिकेच्या जलतरण तलावांवर एक तास पोहण्यासाठी वीस रुपये शुल्क आकारण्यात येते.
 
तसेच मासिक पास 500 रुपये, तिमाहीसाठी 1200, तर वार्षिक 4500 रुपयापर्यंतचे पास देण्यात येतात. त्यामुळे पालिकेच्या तलावांवर उन्हाळ्यात प्रचंड मोठी गर्दी असते. मात्र, महापालिकेने योग्य नियोजन न केल्यामुळे उन्हाळा सुरू झाला असतानाही पाच तलाव अद्याप कुलूपबंद आहेत. थेरगाव, मोहननगर, यमुनानगर, निगडी आणि भोसरी येथील जलतरण तलावाची कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना, खेळाडूंना खासगी जलतरण तलावांवर जास्त पैसे मोजून पोहण्यासाठी जावे लागते. दरम्यान, महापालिकेच्या तलावांवर पोहण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्यात येत आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागाने मासिक पासही ऑनलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहरूनगरमधील कै. अण्णासाहेब मगर, पिंपळे गुरव येथील कै. काळूराम जगताप, पिंपरी वाघेरे, कासारवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेेशर, केशवनगर येथील कै. वस्ताद बाळासाहेब गावडे, सांगवीतील बाळासाहेब शितोळे आणि संभाजीनगर येथील साई अक्वामरिन हे आठ तलाव सुरू आहेत. थेरगावातील खिंवसरा पाटील, मोहननगर येथील राजश्री शाहू महाराज, यमुनानगर येथील मीनाताई ठाकरे, प्राधिकरणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि भोसरीतील कै. बाळासाहेब लांडगे हे पाच तलाव बंद आहेत