आढळराव पाटील हे महायुतीचे नाइलाजास्तव लादलेले उमेदवार

    28-Mar-2024
Total Views |
 
maha
 
पुणे, 27 मार्च (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
संसदेच्या प्रांगणात उभे राहून ज्यांनी आव्हान दिले होते, त्यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा, याचे आश्चर्य वाटले. एवढी वर्षे पुण्याचे नेतृत्व करताना अजित पवार यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलासमोर उमेदवार आयात करावा लागतो, हे शरद पवार यांचे नेतृत्व सिद्ध करते. मंचर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार कांदाप्रश्न, दुधाचा प्रश्न, बिबट्यांचा यावर चकार शब्द उच्चारला नाही याची खंत वाटते, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे नाईलाजास्तव लादलेले उमेदवार असल्याचा टोला लगावला.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मंगळवारी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. अमोल कोल्हे यांनी खाजगीतील गोष्टी सार्वजनिक करायच्या झाल्यास अनेक गोष्टी येतील, असा इशाराही यावेळी अजित पवार यांना दिला; तसेच मंचर येथील सभेत अजित पवार आणि आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेच्या संयमी शब्दांत मात्र तिखट समाचार घेतला. संसदरत्न पुरस्कार चेन्नईतील एका खोलीत बसून दिला जातो, या टीकेला उत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले, हातर शिरूरच्या जनतेचा अपमान आहे. संसदरत्न पुरस्काराची संकल्पना डॉ. ए. पी. जे. कलाम साहेबांची होती. पुरस्कार निवड समितीमध्ये केंद्रीय संसदीय कार्यमंत्री असतात.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळालेल्या संसदरत्न पुरस्काराबद्दल अजित पवार आणि आढळराव पाटील यांनी भूमिका जाहीर करावी, असे आव्हान दिले. आढळराव पाटील यांनी 15 वर्षे खासदार असताना मतदारसंघामध्ये आणलेले प्रकल्प सांगावेत. याउलट मी आणलेले प्रकल्प सांगतो, असे आव्हान देताना इंद्रायणी मेडीसिटी, पुणे-नाशिक रेल्वे, बिबट पुनर्वसन प्रकल्प, छत्रपती संभाजी महाराज स्मारक या संकल्पना कोणाच्या आहेत, हे अजित पवार यांनी सांगावे. उलट आढळराव पाटील यांनी खेडमधील विमानतळ घालविल्याने पिछेहाट झाली.
 
कोरोना काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत प्रत्येक बैठकीला मी होतो. डॉक्टर असल्याने फॅबीफ्लू या गोळीची किंमत कमी करून देशभरातील नागरिकांना उपलब्ध करून देऊ शकलो. सिरमच्या माध्यमातून मतदारसंघातील पाच लाख नागरिकांचे लसीकरण केले. शेतकऱ्यांचा कांदा निर्यात असो अथवा दूधदराचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, संसदेत मी सातत्याने आवाज उठवला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, नितीन कदम, गणेश नलावडे उपस्थित होते.
 
मंचर येथील आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेश मेळाव्यामध्ये डॉ. कोल्हे हे केवळ संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्या भूमिकेबद्दल सांगतात. नथुराम गोडसे यांच्या भूमिका केल्याबद्दलही बोला, असे आवाहन अजित पवार यांनी केले. यावर बोलताना डॉ. कोल्हे यांनी त्या भूमिकेबद्दल नंतर आळंदी येथे प्रायश्चित्त केल्याचे सांगितले. परंतु आज नथुराम गोडसे यांच्या मी केलेल्या भूमिकेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या स्टेजवर राहून पुन्हा बोला, असे प्रतिआव्हान करत डॉ. कोल्हे यांनी अजित पवार यांच्या आव्हानातील हवाच काढून टाकली.
 
अजित पवार यांची माझ्याबाबतची मागील वर्षी 27 जूनपूर्वीची भूमिका आणि त्यानंतरची भूमिका ही पब्लिक डोमेनमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील सभेत केलेल्या उल्लेखानंतर अजित पवार यांची भूमिका बदलली. मी माझ्या भूमिकेशी ठाम असून, माझी निष्ठा कायम शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे यूटर्न कोणी आणि का घेतला, हे जनतेला माहिती आहे. खाजगी गोष्टी उघड करायचेच ठरवले आहे, तर येत्या काळात मलाही त्या उघड कराव्या लागतील, असा सूचक इशाराही डॉ. कोल्हे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता दिला.