पुरुषांनाही आकर्षक, देखणे दिसायचे आहे

    17-Mar-2024
Total Views |
 
 


look
 
 
चित्रपटांतील अँग्री यंग लुकचा हिराे साेडून चाॅकलेटबाॅय लुक असलेला हिराे आपल्याला कधी आवडायला लागला, हे कळलेदेखील नाही. मात्र पुरुषांच्या दिसण्याविषयीच्या आवडीनिवडी बदलून त्यांच्यात साैंदर्याविषयीची जागरूकताही वाढायला लागली असल्याचे दिसायला लागले आहे.त्यामुळेच पुरुषांच्या साैंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ वेगाने वाढताना दिसते आहे.आजच्या स्पर्धेच्या युगात बावळा वेश तर केव्हाच गळून पडला असून, पेहरावांबराेबरच सुंदर आणि नीटनेटके राहण्याचे महत्त्व प्रत्येक पुरुषाला पटले आहे. त्याची कारणेही तशीच आहेत. आपले वाढते वय लपवण्याच्या दृष्टीनेही पुरुष प्रयत्नशील असतात. समाेरच्या व्यक्तीसमाेर आपण कितपत प्रेझेंटेबल राहू शकताे यावर करिअरचे यश अवलंबून असते हे अनेक पुरुषांना कळले आहे. त्यामुळे जर आपला प्राेफेशनल अ‍ॅपिअरन्स चांगला ठेवला तर आयुष्यात वयाच्या खूप उशिरापर्यंत कार्यरत राहू शकताे, असे 45 वर्षांच्या वयाेगटातील पुरुषांना वाटते, तर 20 ते 30 वयाेगटातील पुरुष ट्रेंडी आणि इमेज काॅन्शियस असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे.
 
दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा पुरुषांसाठी फेअरनेस क्रीम बाजारात आले. त्यापूर्वी अशा क्रीम या फक्त बायकांसाठीच असतात किंवा अशा क्रीम लावल्या तर आपल्याला कुणी बायकी म्हणेल असे पुरुषांना वाटायचे. पण, पुरुषांसाठीच्या क्रीमवर पुरुषांच्या विशेषतः तरुणांच्या इत्नया उड्या पडल्या, की मग वेगवेगळ्या कंपन्याही असे क्रीम तयार करू लागल्या. क्रीमच्या बराेबरीने वेगवेगळे मेन्स डिओड्रन्ट आले. ताेंडाला लावायची पुरुषांची पावडर वेगळी आणि स्त्रियांची वेगळी. डाे्नयाला लावायचे तेल वेगवेगळे. असं जे-जे वेगळं करता येईल ते-ते कंपन्यांनी वेगळं केलं. त्यामुळे आपणही सुंदर दिसू शकताे किंवा दिसलाे पाहिजे, असे पुरुषांना वाटू लागले.पूर्वी केस पांढरे झाले की वृद्धत्व चेहऱ्यावर झळकू लागायचं. आता वृद्धत्व आलं तरी केस पांढरे दिसत नाहीत. कारण आता केसही रंग बदलू लागले आहेत.
 
असाेचेमने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार पुरुष साैंदर्यप्रसाधने खरेदी करण्यात महिलांपेक्षाअधिक पैसा खर्च करताना दिसत आहेत. यात 25 ते 45 वयाेगटातील पुरुष आघाडीवर आहेत. या अहवालानुसार गेल्या तीन वर्षांत पुरुष साैंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ वर्षाला 45 टक्के दराने वाढती आहे. सध्याच्या 16,800 काेटींवरून येत्या पाच वर्षांत ती 35 हजार काेटींचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे. वाढती कमाई, वाढते शहरीकरण, जीवनशैलीतील बदल ही कारणे यामागे दिली जात आहेत.दाढीसाठी वापरण्यात येणारी उत्पादने, गाेरेपणासाठीची क्रीम यांचा खप सर्वाधिक आहे. त्या खालाेखाल डिओड्रंटचा नंबर आहे.स्वाभाविकपणे नव्या बाजारपेठ केंद्रित अर्थव्यवस्थेत पुरुषांच्या गळी साैंदर्यप्रसाधने उतरवण्यात कंपन्यांना चांगलेच यश आले असल्याचे दिसते. त्यामुळे आता ब्यूटी साेपच्या जाहिरातीत पुरुषांच्या सहभागाचा ट्रेंडच आला.
 
आता साैंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये पुरुषांना पाहण्याची सवय झाली असली, तरी या ट्रेंडमधून जाणवणारी गाेष्ट म्हणजे आज खास पुरुषांसाठी नवनवीन ब्यूटी प्राॅडक्ट्स निर्माण हाेताना दिसताहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरुषांमध्ये साैंदर्याची जाणीव वाढली असल्याचे, वाढत असल्याचेच दिसून येते.खरे तर पुरुषांना आपल्या साैंदर्याची तितकीच जाण असते, जितकी स्त्रियांना. फक्त पूर्वी फरक इतकाच असायचा, की पुरुष तसे दाखवत नसत. स्वतःच्या साैंदर्याविषयी फार बाेलणेही त्यांना आवडायचे नाही. आता त्यांच्यामध्ये स्वतःच्या देखणेपणाची जाण वाढल्याचे दिसत असले, तरी हाताच्या बाेटांवर माेजता येतील इतकेच पुरुष ते ब्यूटीकाॅन्शस असल्याचे मान्य करतात. पुरुषांनाही आता सुंदर दिसावंसं वाटतं. त्यासाठी ते वेगवेगळी प्राॅडक्ट्सही वापरतात. त्वचेची काळजी घेतात. स्त्री असाे वा पुरुष, उत्तम दिसण्याची गरज दाेघांनाही असते. त्यामुळे चांगले दिसण्यासाठी पुरुषांनी प्रयत्न करणे स्वाभाविक असल्याचे आता पुरुष खासगीमध्ये मान्य करू लागले आहेत.