वांद्य्रातील सदनिकांच्या चाव्या कर्मचाऱ्यांना सुपूर्द

    14-Mar-2024
Total Views |
 
 

Home 
 
 
वांद्रे-पूर्व येथील शासकीय इमारतीतील सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आल्या. या सदनिका लाॅटरी पद्धतीने देण्यात येत असून, 6 शासकीय कर्मचाऱ्यांना सह्याद्री अतिथिगृहात प्रतीकात्मकरित्या या चाव्या देण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रमाेद बनगाेसावी आदी उपस्थित हाेते. यावेळी प्रभा जाधव, मनीषा माेरे, सुरेखा जाधव, सचिन काेळवणकर, जितेंद्र नाईक, प्रमाेद कासले या शासकीय कर्मचाऱ्यांना सदनिकांच्या चाव्या देण्यात आल्या. वांद्य्रात शासकीय जमिनीवर 96 एकर जागेत 1958 ते 1973 च्या दरम्यान शासकीय वसाहत बांधण्यात आली.
 
या वसाहतीत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 व वर्ग-4 नुसार 370 इमारतींत एकूण 4782 सदनिका आहेत. या वसाहतींतील धाेकादायक असलेल्या 68 इमारती पाडण्यात आल्या असून, या इमारतींच्या जागेवर सध्या टप्पा-1 अंतर्गत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्या चतुर्थ श्रेणीसाठी एकूण 2012 निवासस्थानांचे बांधकाम सुरू आहे. ही निवासस्थाने टप्प्याटप्प्याने उपलब्ध हाेणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात इमारत क्र. सी-1, ए-1 व बी-2 तसेच बी-1 इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्यात एकूण 660 निवासस्थाने आहेत. त्यातील बी-1 या इमारतीतील 128 सदनिका सावित्रीबाई फुले वसतिगृहासाठी देण्याचे निश्चित झाले आहे.