जेएनपीए ते गेट-वे दरम्यानचा प्रवास 25 मिनिटांत हाेणार

    30-Dec-2024
Total Views |
 

JNP 
 
जेएनपीए बंदर ते मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियादरम्यान सुरू असलेला जलप्रवास फेब्रुवारीपासून जलद हाेणार आहे. सध्याचा तासाभराचा असलेला हा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत वातानुकूलित ई-स्पीड बाेटीतून करता येईल. त्यामुळे उरणकरांना गारेगार प्रवास सुविधा उपलब्ध हाेणार आहे.या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार आहेत. जेएनपीए बंदर ते गेट-वे ऑफ इंडिया या मार्गावरील लाकडी प्रवासी बाेटींना सरत्या वर्षात अल्विदा करण्याचा निर्णय जेएनपीए संचालक मंडळाने घेतला आहे. नवीन वर्षापासून बंदरातून मुंबईत प्रवाशांना घेऊन जाण्या-येण्यासाठी अद्ययावत स्पीड बाेटी धावणार आहेत.या प्रदूषणविरहित स्पीड बाेटीमुळे 25मिनिटांत प्रवाशांना जेएनपीएहून मुंबईत पाेहाेचता येईल. याचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच हाेणार आहे. जेएनपीएचे कामगार, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सीमाशुल्क, हवाईदल, सीआयएसएफ, पाेर्ट यूजर्स आदी कामगारांसाठी या सागरी मार्गाचा वापर करता येईल.
 
सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत या मार्गावरून बाेटी सुरू असतात.जेएनपीए प्रशासनाने लाकडी प्रवासी बाेटी बंद करण्याचा निर्णय घेऊन त्या जागी प्रदूषणविरहित इलेक्ट्राॅनिक बॅटरींवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व साेयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीड बाेटींचा पर्याय स्वीकारला आहे.प्रदूषणविरहित, सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत ये-जा करण्यासाठी स्पीड बाेटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अमलात आणण्यासाठी सूचना केली हाेती. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केल्याची माहिती जेएनपीएचे उपसंरक्षक कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली. जेएनपीएने 10 वर्षांच्या कालावधीसाठी दाेन स्पीड बाेटींच्या 37 काेटी 89 लाख 94 हजार 190 खर्चाच्या निधीलाही 20 डिसेंबरला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी दिल्याची माहिती जेएनपीएचे विश्वस्त रवींद्र पाटील यांनी दिली.