जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचा ‌‘टीबीमुक्त शाळा' उपक्रम लाँच

    29-Nov-2024
Total Views |
 
sh
 
 पुणे, 28 नोव्हेंबर (आ.प्र.) :
 
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ही प्रसिद्ध जागतिक आरोग्य संशोधन व तज्ज्ञ संस्था भारतीय भागीदारांसह ‌‘टीबीमुक्त शाळा' हा उपक्रम लाँच करत आहे. भारतातील क्षयरोगाच्या समस्येला आळा घालण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. जॉन हॉपकिन्स गुप्ता- क्लिन्स्की इंडिया इन्स्टिट्यूटतर्फे (जीकेआयआय) या तीन वर्षांच्या उपक्रमासाठी सुमारे 300 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. भारतात दरवर्षी 15 वर्षांखालील अंदाजे 3,40,000 मुलांना क्षयरोगाची लागण होत असते. क्षयरोगाच्या एकूण रुग्णांमध्ये मुलांचे प्रमाण 13 टक्के असले, तरी केवळ 6 टक्के मुलांचे निदान होते व त्यांच्यावर उपचार केले जातात. इतरांमध्ये मिसळताना, शाळेसारख्या ठिकाणी क्षयरोगाचा प्रसार होतो असे बदलत्या वैज्ञानिक शोधातून दिसून आले आहे.
 
हॉपकिन्सच्या जीकेआयआयमधील तज्ज्ञांच्या मते किशोरवयातील आणि लहान मुलांमधील क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असून, त्यामुळे आजाराचे व लागण होण्याचे प्रमाण कमी करणे शक्य होईल. भारतातील आघाडीच्या शैक्षणिक वैद्यकीय संशोधन संस्था आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने जगभरातील क्षयरोगाचा प्रतिबंध आणि उपचारांत लक्षणीय बदलांची यापूर्वीच दखल घेतली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथील सेंटर फॉर ट्युबरक्युलॉसिस रिसर्च आणि भागीदार संस्थांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की उदाहरणार्थ क्षयरोग प्रतिबंधक एक महिन्याचा उपचार सुरक्षित आणि नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कोर्सइतकाच प्रभावी आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेने या अभ्यासाचा त्यांच्या क्षयरोग उपचारविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश केला आहे. आणखी एका संयुक्त इंडिया- जॉन हॉपकिन्स रिसर्च अभ्यासामुळे भारतातील क्षयरोग रुग्णांच्या घरगुती संपर्काच्या चाचणीसाठी आणि प्रतिबंधात्मक थेरपीवर देखरेख करण्यासाठी मदत झाली. या पद्धतीत प्रसार रोखला जातो आणि क्षयरोगाच्या तीव्र केसेस तयार होण्याची शक्यता कमी होते.
 
टीबीमुक्त शाळा उपक्रम इंडिया- जेएचयू रिसर्च यांच्यात एकत्रितपणे करण्यात आलेल्या अभ्यास अहवालाच्या यशाच्या पायावर रचण्यात आला आहे. त्यामध्ये टीबीविषयी माहिती, तपासणी, उपचार, मोबाइल सर्व्हिस डिलिव्हरी मॉडेल्सद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हिमाचल प्रदेशातील तिबेटियन लोकसंख्येसाठी प्रतिबंधात्मक थेरपी यांचा समावेश आहे. या प्रकल्पाने धरमशाला येथील मॉनेस्ट्रीज व शाळांमधील क्षयरोगाचे प्रमाण वाजवी पद्धतीने कमी करण्यात आल्याचे दाखवून दिले आहे. या यशाने प्रेरित होत आणि नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्रॅम व इतर सीएसआर भागीदारांच्या सहकार्याने तीन राज्यांतील चार ठिकाणी या उपक्रमाचा विस्तार केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील पुणे व सातारा, उत्तर प्रदेश येथील गोरखपूर आणि तमिळनाडूमधील चेन्नई यांचा समावेश आहे.
 
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधील संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता गुप्ता म्हणाल्या, संसर्गजन्य आजार केंद्र क्षयरोगाला चालना देणाऱ्या पद्धती पुराव्यासह शोधण्यासाठी बांधील आहे. क्षयरोगमुक्त शाळा उपक्रमाने लवकर निदान, उपचार व प्रतिबंध यामुळे लहान मुलांमधील क्षयरोगाचे प्रमाण कमी होत असल्याचे दाखवून दिले आहे. हा उपक्रम क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असून, त्यामुळे क्षयरोगमुक्त पिढी उभारण्यासाठी आमच्या एकत्रित प्रयत्नांना बळकटी देणारा आहे.