नवी मुंबई, 29 ऑक्टोबर (आ.प्र.) :
नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे स्वच्छतेत नेहमीच आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबईतील जागरूक नागरिकांनी दिवाळी उत्सव पर्यावरणशील, फटाकेमुक्त व प्लॅस्टिकमुक्त साजरा करण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले असून, या दृष्टीने महापालिकाही तशा प्रकारची कार्यवाही करत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात स्वच्छता अभियान राबवले. दिवाळीपूर्वी नागरिक घरांची साफसफाई करतात. नागरिकांनी आपल्याला नको असलेल्या वस्तू महापालिकेने शहरात 92 ठिकाणी उभारलेल्या थ्रीआर सेंटरमध्ये आणून ठेवाव्यात. जेणेकरून त्या गरजूंपर्यंत पोहचून त्यांची दिवाळी आनंदात जाईल; तसेच उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोयीचे ठरेल, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
दिवाळीपूर्वी विशेष स्वच्छता मोहीम आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. शहरातील मुख्य मार्गांवरील दुभाजकांचे कॉर्नर व पदपथांवरील गाळ सुकून झालेली माती काळजीपूर्वक साफ करण्यात येत आहे. यासाठी मॅकेनिकल स्विपिंग वाहने; तसेच वॉटर स्प्रेइंग वाहनांचा वापर करण्यात येत आहे. यात अग्निशमन विभागाचेही विशेष सहकार्य मिळत आहे. रस्त्यांच्या कडेला साचलेली माती जमा करण्यात येत असून, त्यानंतर या रस्त्यांची जेटिंग मशीनद्वारे पाणी मारून सफाई करण्यात येत आहे. यासाठी वापरण्यात येणारे पाणी मलप्रक्रिया केंद्रातील शुद्धीकरण केलेले प्रक्रियाकृत पाणी असून, यामुळे रस्तेसफाईसोबतच पिण्याच्या पाण्याची बचतही केली जात आहे. या स्वच्छतेमुळे रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत. नागरिकांनी पर्यावरणशील दृष्टिकोन बाळगत दिवाळीच्या सजावट साहित्यांत प्लॅस्टिकचा वापर टाळून कागद, कापड अशा पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करावा; तसेच प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.