मतदार जागृतीसाठी ‌‘कॉफी विथ कलेक्टर' उपक्रम

लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी साधला नवमतदारांशी संवाद; मतदान करण्याचे केले आवाहन

    30-Oct-2024
Total Views |
 
 
ma
 
लातूर, 29 ऑक्टोबर (आ.प्र.) :
 
विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्ह्यात स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जागृती अभियान राबवण्यात येत आहे. यात येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‌‘कॉफी विथ कलेक्टर' उपक्रम आयोजिण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी युवा मतदारांशी संवाद साधून विधानसभा निवडणुकीत सर्वांना मतदानाचे आवाहन केले.
 
माध्यमिकचे शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी नागेश मापारी, योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बल्लाळे, डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. संध्या वाडीकर, प्रा. विलास कोमटवाड, डॉ. संदीपान जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि मत हा लोकशाहीत सर्वांत महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक युवा मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावावा. आपल्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबरला मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
 
प्रत्येक मत मौल्यवान असून, आपल्याला मिळालेल्या या अधिकाराचे मोल लक्षात घेऊन नवमतदार, वयोवृद्ध नागरिक, महिलांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी युवक-युवतींशी मनमोकळा संवाद साधत त्यांना लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक मतदाराचे महत्त्व याबाबत माहिती दिली; तसेच निवडणूक प्रक्रिया, लोकशाही व्यवस्थेबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विविध बाबींवर प्रकाश टाकला. यात युवक- युवतींनी उत्स्फूर्तपणे भाग घेत विविध प्रश्नांची उत्तरे दिली; तसेच लोकशाही आणि निवडणुकीबाबत आपले मत व्यक्त केले.