दुर्गमहर्षी प्रमोद मांडे पुरस्कार सोहळा उत्साहात

24 Oct 2024 14:11:34
 
du
 
पिंपरी, 23 ऑक्टोबर (आ.प्र.) :
 
‘दुर्गमहर्षी प्रमोद मांडे दुर्गपाईक पुरस्कार' व ‌‘दुर्गमहर्षी प्रमोद मांडे क्रांतीपाईक पुरस्कार' देऊन या दोन्ही विषयांमध्ये कार्य करणाऱ्या अभ्यासक आणि संशोधकांना पुरस्कृत केले जाते. यंदा गडकिल्ल्यांच्या क्षेत्रात अव्याहतपणे कार्य करणारे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, लेखक, व्याख्याते आणि वनस्पतिशास्त्र तज्ज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर यांना यंदाचा ‌‘दुर्गमहर्षी प्रमोद मांडे पुरस्कार', तर युवा अभ्यासक डॉ. प्रा. किशोर वानखेडे यांना ‌‘दुर्गमहर्षी प्रमोद मांडे क्रांतीपाईक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, मोडी लिपी तज्ज्ञ आणि भारत इतिहास संशोधन मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 
यावेळी व्यासपीठावर डॉ. केदार फाळके आणि भारत मांडे उपस्थित होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना प्रा. प्र. के. घाणेकर यांनी प्रमोद मांडे हे माझे सहृदयी मित्र होते, असे मत व्यक्त केले. क्रांतीपाईक पुरस्काराचे मानकरी डॉ. प्रा. किशोर वानखेडे, डॉ. केदार फाळके यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंगजी बलकवडे यांनी दुर्गमहर्षींच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी गडकिल्ले सेवा संस्थेने भारत इतिहास संशोधन मंडळाच्या नव्याने पुनर्विकसित होत असलेल्या वि. का. राजवाडे सभागृहात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवभूषण निनादजी बेडेकर आणि दुर्गमहर्षी प्रमोद मांडे या तीनही असामान्य प्रतिभेच्या तपस्वींची तैलचित्रे लावून त्यांचा सन्मान करावा, असे पत्र देण्यात आले असता, पांडुरंग बलकवडे यांनी या विषयावर मंडळात देखील हा निर्णय झाला असून, सभागृहात या तीनही प्रतिमा लावण्यात येणार आहेत, असे बलकवडे यांनी सांगितले. इतिहास अभ्यासक नीलेश गावडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संतोष घुले यांनी, तर सौरभ मोडक यांनी आभार मानले.
Powered By Sangraha 9.0