उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात

11 Oct 2024 17:37:02
 
 
up
 
सोलापूर, 10 ऑक्टोबर (आ.प्र.) :
 
राज्यातील 242 शासकीय व सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येथे करण्यात आले. त्याचसोबत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील वीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पायाभूत वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी 2773 कोटींच्या विविध कामांचा प्रारंभ करण्यात आला. आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, विजय देशमुख, शहाजी पाटील, संजयमामा शिंदे, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी आणि राम सातपुते, माजी खासदार जयसिद्धेेशर महास्वामी, तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे आदी उपस्थित होते.
 
उपसा जलसिंचन योजनांना सौर ऊर्जे द्वारे वीजपुरवठा व्हावा आणि किफायतशीर दरात वीज उपलब्ध व्हावी, यासाठी या योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली. यासाठी राज्य सरकारने 3366 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी राज्याचा ऊर्जा विभाग, महावितरण आणि जलसंपदा विभाग सहकार्याने काम करत आहे. जलसंपदा विभागाने सौर ऊर्जीकरण प्रकल्पांसाठी साडेतीन हजार एकरापेक्षा अधिक जमीन उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत 905 मेगावॉट सौर ऊर्जानिर्मिती क्षमता निर्माण होणार आहे. टेंभू, जिहे कठापूर, ताकारी, लोअर वर्धा, अप्पर प्रवरा अशा सर्व लहानमोठ्या उपसा सिंचन प्रकल्पांना आता सौर ऊर्जे द्वारे निर्माण झालेली वीज उपलब्ध केली जाईल. विशेष बाब म्हणजे 120 सहकारी उपसा सिंचन योजनांचेही सौर ऊर्जीकरण या योजनेत करण्यात येणार आहे.
 
आगामी दोन वर्षात ही कामे पूर्ण होतील. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील आणि सिंचन क्षेत्रातील हे ऐतिहासिक पाऊल आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत सध्या 9200 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात वीज निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी आरडीएसएस योजनेंतर्गत पायाभूत सुविधा बळकटीकरण करण्यासाठी शासनाने 3000 कोटींची कामे मंजूर केली आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व उत्तर महाराष्ट्रातील 1697 कोटींच्या कामांचा प्रारंभ यावेळी झाला. यात 90 नवी वीज उपकेंद्रे उभारणे, 238 ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढ आणि 1705 कि.मी.च्या 33 केव्हीच्या उच्चदाब वाहिन्या बसवणे अशा कामांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0