पिंपरी, 30 सप्टेंबर (आ.प्र.) :
आम्ही देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू... आणि निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू... कोणत्याही विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू... अशी शपथ 4 हजारांहून अधिक धावपटू, सायकलपटूंनी महापालिकेतील अधिकारी, रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या पदाधिकाऱ्यांसह रनथॉन ऑफ होप मॅरेथॉन कार्यक्रमात घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
रविवारी (दि 29) पिंपरी-चिंचवड महापालिका व रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या वतीने आयोजित रनथॉन ऑफ होप मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे 4 हजारांहून अधिक धावपटू, सायकलपटू सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात आगामी निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. निगडी प्राधिकरण येथे पार पडलेल्या कार्यक्रमास मुख्य माहिती-तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, इंटरनॅशनल रोटरी क्लबचे नियोजित प्रांतपाल नितीन ढामले, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले, ‘रनथॉन'चे संचालक केशव मानगे, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, सहायक आयुक्त अजिंक्य येळे, किरण मोरे, मुकेश कोळप, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, रोटरी क्लबचे सचिव डॉ. रवींद्र कदम, शशांक फडके; तसेच माजी सैनिक, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि विविध विभागांतील कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.
तरुणांचा मोठा उत्साह...
रनथॉन ऑफ होप मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या धावपटू, सायकलपटूंनी स्वयंस्फूर्तीने मतदान जनजागृतीचे फलक हाती घेतले होते; तसेच त्यांनी त्यासोबत सेल्फीही काढले आणि आगामी विधानसभा निवडणुकीत केवळ मतदानच नव्हे; तर मतदान जनजागृतीचा प्रसार व प्रचार करण्याची तयारीहा दर्शविली.